मुंबई: लग्नासाठी मॅट्रिमोनी साइटवर आयुष्याचा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न एका २६ वर्षीय तरुणीने केला. मात्र त्यावर तिची भेट झाली ती सायबर भामट्याशी, ज्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत लाखोंचा चुना लावला. या विरोधात तिने बोरिवली पोलिसात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरिवली पश्चिमच्या सत्यानगर परिसरात तक्रारदार मानसी (नावात बदल) या आई वडिल तसेच भावासोबत राहतात. त्या प्रॉपर्टी सेलिंगचे काम प्रभादेवी या ठिकाणी करत असून जीवनसाथी या वेबसाईटवर लग्नासाठी त्यांनी स्वतःचे नाव नोंदवले होते. दरम्यान या ठिकाणी त्यांची ओळख स्वतःचे नाव वैभव शाह सांगणाऱ्या व्यक्तीशी झाली. त्याने १ नोव्हेंबर रोजी मानसीला बोलण्यात गुंतवत लग्नाचे आमिष दाखवले. त्याच्यासोबत सुखी आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या मानसीला बोलता बोलता त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.
मी तुला मदत करतो त्यात तुला चांगला फायदा होईल असेही म्हणाला. इतकेच नव्हे तर शाहने तिला गुंतवलेले पैसे दुप्पट करून देण्याचेही आश्वासन दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तिने त्याच्यावर विश्वास ठेवत १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान शाहला ६ लाख ९९ हजार ५०० तिच्या बँक खात्यातून पाठवले. मात्र नंतर फोन उचलणे बंद केले. तेव्हा शेअर मार्केटच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे मानसीच्या लक्षात आले आणि तिने शाहच्या विरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली.