ड्रग्जचे सेवन केल्याप्रकरणी ‘त्या’ मुलांवर होणार गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:43 AM2018-05-23T00:43:34+5:302018-05-23T00:43:34+5:30
तीन अल्पवयीन मुलांचा समावेश : अथर्व शिंदे मृत्यू प्रकरण
मुंबई : अथर्व शिंदे (२०) याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हे शाखेकडून काही तरुणांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्यावर अंमली पदार्थ सेवन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येत आहे. यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, गुन्हे शाखा या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे.
अथर्वचा मृतदेह आरे परिसरात सापडल्यानंतर, त्याच्यासोबत पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात ती मुले नशेत होती. त्यांनी दारूसह अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार, या मुलांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दोषी आढळलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. काही मुलांची वैद्यकीय चाचणी केली असून, त्याच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. तो अहवाल आल्यानंतर संबंधित तरुणांवर आम्ही अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या तरुणांनी ६ ते ७ प्रकारची नशा केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
मैत्रिणीलाही समन्स
अथर्वच्या मैत्रिणीलादेखील गुन्हे शाखेने समन्स पाठविले असून, ती बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजनुसार त्याच्या मैत्रिणीसह दोन तरुण अथर्वच्या मागे धावताना दिसत असल्याचे त्याचे वडील नरेंद्र शिंदे यांचे म्हणणे आहे. या दोघांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे एका अधिकाºयाने नमूद केले. अथर्वची हत्या करण्यात आल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार, या प्रकरणी पोलीस चौकशी करत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.