Join us

मंत्रालयाचे मस्टर सोडविणार केईएमच्या ‘मस्टर’चा वाद

By admin | Published: April 06, 2015 4:44 AM

केईएम रुग्णालयातील मस्टरचा वाद सोडवण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी मंत्रालयाचा आधार घेण्याचे आदेश दिले आहेत

मुंबई : केईएम रुग्णालयातील मस्टरचा वाद सोडवण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी मंत्रालयाचा आधार घेण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून केईएम रुग्णालयातील मस्टरचा वाद चिघळला होता. सेवाज्येष्ठतेनुसार नावे लिहावीत, ही मागणी कर्मचाऱ्यांची आहे. पण हा सर्वसामान्य नियम मंत्रालयाच्या नियमावलीत आहे की नाही हे आधी तपासा, असे अतिरिक्त आयुक्तांचे म्हणणे आहे. केईएम रुग्णालयातील क्ष-किरण विभागातील मस्टरवर सेवाज्येष्ठतेनुसार नावे लिहिली जात नाहीत. यामुळे सेवा जास्त असूनही त्यांची नावे शेवटी लिहिली जातात. याविषयी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता, ठोस कोणतेही उत्तर मिळत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून म्युनिसिपल मजदूर युनियन या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहे. आधी त्यांना या प्रश्नावर समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. यानंतर ३१ मार्च रोजी झालेल्या बैठकीत त्यांना लेखी स्वरूपात दोन मस्टर करून दिली जातील, असे सांगितले होते. नियमित कर्मचारी आणि तदर्थ कर्मचाऱ्यांची दोन वेगळी मस्टर केली तरी चालेल; पण नावे सेवाज्येष्ठतेनुसार द्या, इतकीच मागणी असल्याचे युनियनचे म्हणणे होते. पण आता मस्टर लिहिण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागात जावे. तिथे मस्टर लिहिण्याची नियमावली असते, ती घेऊन यावी आणि पुढे जाऊन त्या नियमावलीनुसार मस्टर तयार करावे, असे आदेश देण्यात आल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी युनियनला सांगितले. आता विभागप्रमुख कधी मंत्रालयात जाणार, याची वाट युनियन पाहात आहे. (प्रतिनिधी)