कासवाच्या पिल्लांचे प्रकरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 02:58 AM2018-03-26T02:58:25+5:302018-03-26T02:58:25+5:30

वर्सोवा किनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची पिल्ले आढळली होती.

The matter of turtle cubs washed | कासवाच्या पिल्लांचे प्रकरण तापले

कासवाच्या पिल्लांचे प्रकरण तापले

Next

मुंबई : वर्सोवा किनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची पिल्ले आढळली होती. मात्र, यावर काही पर्यावरणवाद्यांनी आक्षेप नोंदवित, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या संदर्भात वनविभागाकडे तक्रार करण्यात आली असतानाच, या प्रकरणातील चौकशीदरम्यान ज्या ठिकाणी कासवाची पिल्ले आढळली, तिथेच बाजूला अंड्यांचे आवरणही सापडले आहे, असे राज्याच्या वन विभागाच्या कांदळवन कक्षाचे प्रमुख एन. वासुदेवन यांनी स्पष्ट केले आहे.
वर्सोवा बीचवर कासवांची पिल्ले आढळून आली, ही बाब जरा संशयास्पद वाटते. त्यामुळे यासंबंधी अधिक चौकशी करण्यात यावी. यासाठी कांदळवन कक्ष वनविभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. चार बाय चार फुटाच्या खड्ड्यामध्ये कासवांची पिल्ले आढळून आली. त्या खड्ड्यात अंडी नव्हती, फक्त पिल्ले दिसून आली.
वनविभागाच्या अधिकाºयांनी प्रसारमाध्यमांना एका घमेल्यात काही अंडीही दाखविली, परंतु पर्यावरण तज्ज्ञांनी अंड्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण बीच पालथा घातला. त्या वेळी अंडी सापडली नाहीत, तसेच परिसरात मेथी भाजीची शेती केली जाते. या शेतीला सारखे पाणी घालावे लागते. ओलसर भागात कासव अंडी देत नाही. कारण ओलसर भागात अंडी कुजतात, अशी माहिती वनशक्ती प्रकल्प संचालक डी. स्टॅलिन यांनी दिली. स्टॅलिन म्हणाले की, ज्या ठिकाणी माणसांचा वावर आहे, तिथे सहसा कासव अंडी घालण्यासाठी येत नाहीत. वर्सोव्यात सापडलेल्या पिल्लांच्या ठिकाणी शेती केली जाते. मग कासव कसे काय येऊन अंडी घालून जाऊ शकेल? जर खरोखर कासवाची पिल्ले सापडली असती, तर मुंबईसाठी ती नक्कीच चांगली गोष्ट होती, परंतु ही घटना नीट उलगडत नाही. या प्रकरणी सर्वस्तरातून चौकशी झाली पाहिजे.
वर्सोवा बीच स्वच्छता मोहिमेचे जनक अफरोझ शाह यांनी सांगितले, बीचवर आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांची अंडी सापडली नाहीत, असे काही लोकांचे म्हणणे आहे. ते लोक घटनास्थळी आलेले नाही. त्यामुळे त्यांना खरी परिस्थिती माहीत नाही.
वर्सोवा बीच तीन किलोमीटरपर्यंत पसरला आहे. ज्या ठिकाणी कासवाची पिल्ले आढळली. त्या परिसरात हजारोंच्या संख्येने मेथीची लागवड होते. लागवडीजवळ कोणी फिरकतही नाही, तिथे वीजही नाही. त्यामुळे तिथे स्वच्छता केली जात नाही. तिथे कोणी वारंवार जात नसल्या कारणाने, कदाचित कासवाने मेथीच्या लागवडीत घरटे केले असावे.
तेथील लागवड करणाºया लोकांनासुद्धा माहीत नव्हते की, तिथे कासवाची पिल्ले आहेत. त्याचदरम्यान, एक व्यक्ती एका मेथीच्या खड्ड्याशेजारी दुसरा खड्डा खणत होता. त्या वेळी तिथून कासवांची पिल्ले बाहेर पडलेली असावी. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने सांगितले की, बीचवर एक कासव आम्हाला दिसले होते. तेव्हापासून आमची टीम सावध झाली होती. म्हणून वनविभागाच्या अधिकाºयांना संपर्क करून बोलविण्यात आले.
वनअधिकाºयांनी एक पंचनामा तयार करून, त्यावर मी आणि माझ्या सहकाºयाने स्वाक्षरी केली. यात आम्ही तिघे प्रत्यक्षदर्शी होतो. सकाळी ७.३० वाजता वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि कासवाचे घरटे खोदायला सुरुवात केली. खोदकाम जवळजवळ दोन तास सुरू होते. जे लोक संशय घेत आहेत, ते घटनास्थळी आलेले नाहीत. यात कोणी दोषी असेल, तर त्यांना वन्यजीव संरक्षण कायद्यातंर्गत शिक्षा झाली पाहिजे, असेही शाह यांनी सांगितले.

Web Title: The matter of turtle cubs washed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.