Join us

रविवारी मध्यरात्रीपासून माथाडी संपावर

By admin | Published: April 03, 2016 3:51 AM

किरकोळ व्यवसायातून माथाडी कायदा व बाजार समितीचे नियमन वगळण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात माथाडी कामगारांनी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे.

नवी मुंबई : किरकोळ व्यवसायातून माथाडी कायदा व बाजार समितीचे नियमन वगळण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात माथाडी कामगारांनी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते आ. नरेंद्र पाटील यांनी ही माहिती दिली.शासनाचा निर्णय माथाडी कामगार व अन्य घटकांवर अन्याय करणारा असून, त्याच्या निषेधार्थ संघटनेला तसेच कामगारांना अस्तित्वाची लढाई करावी लागत असल्याने या लाक्षणिक बंदचा निर्णय घेण्याचे जाहीर करून वेळ पडल्यास बेमुदत बंद सुध्दा केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यानंतर होणाऱ्या परिणामांना शासन व संबंधित जबाबदार राहतील, अशी प्रतिक्रिया माथाडी कामगार नेत्यांनी व्यक्त केली. कष्टाची कामे करणाऱ्या घटकाला न्याय देणारा माथाडी कायदा हा एकमेव आशिया खंडातील कायदा असून, शासन हा कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा निषेध कामगारांच्या सभेत करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील माथाडी कामगार आणि अन्य घटकांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. माथाडी भवन येथे झालेल्या बैठकीला आ. शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव तसेच मोठ्या संख्येने माथाडी कामगार उपस्थित होते. कामगार कायद्यात मोठे बदल करण्याच्या विषयावर ३० मार्च २०१५रोजी विधानसभेत चर्चा करण्यात आली. ७ मार्च रोजी विधान परिषदेत राज्याच्या कामगार मंत्र्यांनी काही सूचित केले असले तरी कामगार विभागाने अधिसूचना काढली नसून, तो तिचा मसुदा होता. याबाबत राज्यात जोपर्यंत स्तरावर सर्व संबंधिताची त्रिस्तरीय समिती तयार करून तिच्याद्वारे सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत राज्यात कामगारविरोधी असा कोणताही नवीन कायदा केला जाणार नाही, अशी हमी सभागृहाला दिली. तिचे स्मरण यावेळी नेत्यांनी करून दिले.