Join us

माथाडी कामगारही चक्काजाममध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 5:19 AM

मंगळवारपासून संपात उतरणार; सदस्यांसोबतच्या चर्चेनंतर करणार घोषणा

मुंबई : माल वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगारही मंगळवारपासून संपात उतरणार आहेत. चक्काजाम आंदोलनाची धार वाढविण्यासाठी वाहतूकदारांनी माथाडी कामगार संघटनेसोबत केलेल्या प्राथमिक चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच यासंदर्भातील सविस्तर चर्चा माथाडी संघटनेच्या सदस्यांसोबत केल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याची प्रतिक्रिया माथाडी कामगारांचे नेते आमदार नरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सरचिटणीस अनिल विजन म्हणाले, अत्यावश्यक सेवेला चक्काजाम आंदोलनापासून दूर ठेवण्यात आले आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरून वाहतूकदारांना मागण्या मान्य करून घेण्याची इच्छा नाही. मात्र या आंदोलनाचा फटका बसत असलेल्या माथाडी कामगारांना सामील करून घेण्याचा संघटनेचा मानस आहे. त्याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येईल. मंगळवारपासून बाजारपेठांत आंदोलनाचे तीव्र परिणाम दिसून येतील. मात्र त्याआधी सरकारसोबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.आमदार नरेंद्र पाटील म्हणाले, माल वाहतुकीवर माथाडी कामगारांचे पोट भरते. त्यामुळे माल वाहतूकदार संकटात आल्यावर माथाडी कामगारही संकटात सापडणार आहेत. कारण माल वाहतूक व्यवसाय टिकला, तर माथाडी कामगार टिकणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीच्या काळात माथाडी कामगार त्यांच्यासोबत उभा राहील. सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त माथाडी कामगारांना सुट्टी आहे. त्यानंतर चर्चा करून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली जाईल. मात्र माथाडी कामगारांचे आंदोलन नक्कीच परिणामकारक असेल, असेही पाटील यांनी सांगितले.बाजार समितीच्या आवकवर परिणामनवी मुंबई : वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवकवर परिणाम झाला आहे. शुक्रवारी पाच मार्केटमध्ये १९९६ वाहनांची आवक झाली होती. शनिवारी दिवसभरात १,४५५ वाहनांची आवक झाली. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत माल वाहतुकीवरही परिणाम झाला. एपीएमसीच्या ट्रक टर्मिनल व रोडवर पाच हजारांपेक्षा जास्त ट्रक उभे आहेत. दुसºया दिवशी एपीएमसीच्या आवक-जावकवर मोठा परिणाम झाला. भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा व धान्याची आवकही कमी झाली आहे. भाजीपाला व फळे वगळता इतर मार्केटमधून मुंबई व नवी मुंबईमधील किरकोळ दुकानदारांना साहित्यपुरवठाही झालेला नाही.माल वाहतूकदारांकडून सर्व ट्रेडर्सना माल मिळणार नसल्याची माहिती देण्यात येत आहे. तूर्तास ग्राहकांकडून माल स्वीकारला जात आहे. मात्र तो डिस्पॅच करण्याचे काम पूर्णपणे थांबविण्यात आले आहे. ज्या माल वाहतूकदारांकडून वाहतूक सुरू आहे, त्यांना वाहतूक थांबविण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी ‘डोअर टू डोअर’ आवाहन केले जात आहे. मुंबईच्या बाजारपेठांमधील वाहतूक ठप्प पडल्याने दोन दिवसांत सुमारे २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. - अशोक राजगुरू (उपाध्यक्ष, बीजीटीए)

टॅग्स :संपमुंबईनवी मुंबई