Atal Setu : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी नाव्हा-शेवा सेतूवर गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी एका बँक कर्मचाऱ्याने अटल सेतूवर उडी घेतली होती. त्यानंतर आता आणखी एका व्यावसायिकाने अटल सेतूवरुन उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात असल्यामुळे व्यापाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आता अटल सेतूवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अटल सेतू सध्या सुसाइड पॉइंट बनत चालला आहे. पुलावरून समुद्रात उडी मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशातच बुधवारी एका ५२ वर्षीय व्यावसायिकाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. फिलिप हितेश शाह असे मृत व्यापाऱ्याचे नाव असल्याचे समोर आलं आहे. बुधवारी पहाटे या व्यावसायिकाने अटल सेतूवरुन उडी मारून आपले जीवन संपवले. फिलिप हितेश शाह यांनी आपली कार पुलावर थांबवली आणि समुद्रात उडी घेतली. नवी मुंबई पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन मृतदेह शोधून काढला.
फिलिप शाह हे मुंबईतील माटुंगा भागात कुटुंबासह राहत होते. गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली होते. कदाचित त्यामुळेच त्यांनी एवढे भयानक पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी नऊच्या सुमारास नवी मुंबईपासून सुमारे १४.४ किमी अंतरावर एका अज्ञात व्यक्तीने आपले वाहन थांबवले आणि समुद्रात उडी मारली.
पोलिसांनी सांगितले की, एक बचाव पथक ताबडतोब शाह यांना बाहेर काढण्यासाठी रवाना करण्यात आले. बचाव पथकाला शाह सापडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारापूर्वीच शहा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी त्यांची गाडी तपासली आणि त्यात त्यांचे आधार कार्ड सापडले ज्याद्वारे त्याची ओळख पटली आणि कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला.
शाह यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, फिलिप हे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि नैराश्यात होते. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी एका कार्यक्रमाला जाणार असून काही वेळाने परत येईल असं सांगून सकाळी आठ वाजता घर सोडलं. त्यानंतर फिलिप शाह हे अटल सेतूवर गेले आणि त्यांनी आपलं जीवन संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.