Join us  

शिवनेरीत प्रवाशाला लुटणारा मेरठमधून जेरबंद; खुनासह चोरीचे गुन्हेही दाखल, साथीदाराचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 7:05 AM

सराईत गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुण्याहून मुंबईला शिवनेरी बसने येणाऱ्या पुण्यातील शैलेंद्र साठे यांना कॉफीतून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील किमती ऐवजाची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून अटक केली. युनूस शेख (५२) असे त्याचे नाव आहे. शेखविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न यांसह गुंगीचे औषध देऊन चोरी केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ३ तोळे सोने हस्तगत केले असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

साठे १४ जून रोजी शिवनेरी बसने पुण्याहून मुंबईकडे येत होते. खालापूर येथे बस थांबताच शेखने त्यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले. साठे बेशुद्ध होताच त्यांच्याकडील किमती ऐवज काढून घेत आरोपी दादर परिसरात उतरला. बस दादर थांब्यावर थांबताच कर्मचाऱ्यांनी बेशुद्धावस्थेत असलेल्या साठेंना फुटपाथवर आणून बसवले. साठे ८० तासांनी शुद्धीवर आल्यानंतर २० तारखेला पोलिसांत तक्रार दिली.

खोपोली पोलिसांनी हे प्रकरण माटुंगा पोलिसांकडे वर्ग करताच पोलिस उपायुक्त प्रशांत कदम, सहायक पोलीस आयुक्त संजय जगताप, माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपास अधिकारी संजय परदेशी, संतोष माळी, जयेंद्र सुर्वे आणि अंमलदार यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. 

असा काढला माग

पोलिस पथकाने सीसीटीव्ही, तसेच तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास सुरू केला. गुन्हा केल्यानंतर शेख दादरमध्ये तर, त्याचा साथीदार चेंबूर येथे उतरला. त्यानंतर दोघांनी मुंबई सेंट्रल येथून दिल्लीला जाणारी रेल्वेगाडी पकडली. तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा ठावठिकाणा लागताच पोलिसांचे एक पथक मेरठला रवाना झाले. अखेर, सापळा रचून आरोपीला अटक केली.

आयोगाकडून वृत्ताची दखल

या घटनेची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने लोकमतच्या वृत्ताची दखल स्वतःहून घेतली. या घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तीवर कारवाई केलीत का, असे प्रश्न करत आयोगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्तांना १६ जुलैपर्यंत न्यायमूर्ती के. के. तातेड यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, चौकशी सुरु आहे. 

टॅग्स :मुंबईपुणेमुंबई पोलीसराज्य रस्ते विकास महामंडळ