माटुंगा पादचारी पुलाला गेले तडे, पूल सुरक्षित असल्याचा पालिकेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 10:09 PM2019-04-01T22:09:34+5:302019-04-01T22:11:00+5:30
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक येथील पादचारी पूल पडल्यानंतर मुंबईतील सर्व अतिधोकादायक पूल पाडण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक येथील पादचारी पूल पडल्यानंतर मुंबईतील सर्व अतिधोकादायक पूल पाडण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा स्थानक येथील पादचारी पुलाला तडे गेल्याच्या छायाचित्राने एकच खळबळ उडवली आहे. हा पूल रेल्वे स्थानकालगत असल्याने रेल्वे प्रशासनाने महापालिकेला पत्र धाडले. परंतु हा पूल सुरक्षित असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. सीएसटी पूल दुर्घटनेचंही स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं, त्यावेळी तो सुरक्षित असल्याचं रिपोर्टमधून सांगण्यात आलं होतं. परंतु नंतर तो कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. मुख्यमंत्र्यांनीही सर्वच पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा आदेश दिला होता. त्यातच आता माटुंगा पादचारी पुलाला तडे गेल्याचं चित्र समोर आल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
14 मार्च रोजी सीएसटी येथील हिमालय पादचारी पूल कोसळून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर 31 पादचारी जखमी झाले. या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट सुरु करण्यात आले आहे. तसेच अतिधोकादायक पूल तात्काळ पाडण्यात येत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माटुंगा रोड स्थानक येथील पादचारी पुलाचे छायाचित्र व्हायरल होऊ लागले आहे. या छायाचित्रात या पुलाला तडे गेल्याचे दिसून येत आहे. हा पूल मध्य रेल्वे स्थानकाच्या पुलाला जोडला जात असल्याने या पुलाची देखरेख करणाºया जी उत्तर विभागाला रेल्वे प्रशासनाने कळवले.
त्यानुसार महापालिकेच्या पूल विभागाच्या अभियंत्यांनी तात्काळ या पुलाची पाहणी केली. परंतु पुलाला तडा गेला नसून या पुलाच्या विस्ताराचा जोड असल्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अशाच पद्धतीने हा पुलाचे छायाचित्र सोशल मीडियावर वायरल झाले होते. त्यावेळेस खबरदारी म्हणून महापालिकेने या पुलाचा काही भाग रहदारीसाठी बंद केला होता. दरम्यान या पुलावरून रेल्वे फलाटाकडे जाणारा जिना दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेने बंद ठेवल्या आहेत.