माउली! यंदा वारीला जायचं कसं?; पालखी मार्गावर समस्यांचे ढीग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:08 AM2022-05-26T10:08:34+5:302022-05-26T10:09:00+5:30
१९८४ ला मंजूर झालेला सुमारे २५० किमीचा पालखी मार्ग अखेरच्या टप्प्यात आहे.
बाळासाहेब बोचरे
मुंबई : आषाढी वारी कधी येईल आणि सावळ्या विठूरायाला कधी भेटेन, अशी हुरहुर लागलेल्या अवघ्या वैष्णवजनांना तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा वारीची संधी आली आहे. पायी वारीसाठी लाखो पाय आसुसलेले आहेत. दरम्यान, आळंदी ते पंढरपूर, मोहोळ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने झाले असून, आता वारकऱ्यांसाठी रस्ता मोकळा झाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना वाटचालीला मोकळा रस्ता मिळणार आहे. असे असले तरी वारकऱ्यांपुढे अनेक समस्या वाढून ठेवल्या आहेत.
१९८४ ला मंजूर झालेला सुमारे २५० किमीचा पालखी मार्ग अखेरच्या टप्प्यात आहे. जेजुरी ते लोणंद त्याला अपवाद असेल. त्यामध्ये पंढरपूर ते मोहोळ अशी ५० किमीची वाढ करण्यात आली आहे. या रुंदीकरणामुळे वारकऱ्यांची मुक्कामाची ठिकाणे, दुपारचा विसावा किंवा रस्त्याकडेच्या खुणा नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे वारकऱ्यांचा गोंधळ उडाल्याशिवाय राहत नाही.
एक मात्र बेस झालं...
माउली! एक मात्र चांगलं झालं. जिथं उड्डाणपूल आहेत त्याखाली विश्रांती घेता येईल. ऊन, वारा, पावसापासून बचाव करता येईल. शिवाय वाहने पुलावरून जाणार असल्याने वाहनांचा त्रास होणार नाही की धुराचा त्रास होणार नाही.
माउली...! विश्रांती कुठे घ्यायची?
nमाउली! रस्ता रुंदीकरणात रस्त्याकडेची सगळी झाडे तोडली असल्याने महामार्ग असला तरी तो ओसाड झाला आहे. ऊन अजून कमी होताना दिसत नाही. रस्त्याकडेला कुठेही सावलीला झाड नसेल तर थकलाभागला जीव कुठे विश्रांती घेईल, हीच चिंता आहे.
nरस्त्याकडेचं आंब्याचं झाड, मंदिर, बाभळीचं झाड. तिथून डावीकडे किंवा उजवीकडे वळावे अशा आमच्या
वर्षानुवर्षाच्या खुणा होत्या. त्या आता कुठे दिसणार नसल्याने आमचा गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही.
रिंगणाला जागा अपुरी : पंढरीच्या वाटेत नाचत-गात निघालेल्या वारकऱ्यांसोबत अश्वांचा रिंगणाचा खेळ रंगतो. तोही रस्त्याकडेच्या मैदानातच; पण आता रुंदीकरणात बराचसा भाग गेल्याने रिंगणालाही मर्यादा येते की काय असे वाटते. विशेषत: ठाकूरबुवाची समाधी, पानीव पाटी येथील गोल रिंगणासाठी जागा अपुरी पडू शकते. धर्मपुरी ते पंढरप भंडीशेगाव दरम्यान पुलाची कामे चालू असल्याने बाजूने काढलेल्या रस्त्याने वाहतूक व वारकरी कसे जातील ही चिंता आहेच माउली.
आता तंबू कुठे मारायचा
माउली! रस्ता रुंद झाला, मोकळा झाला तरी ज्या दिंड्या पूर्वी रस्त्याला चिटकून उजव्या किंवा डाव्या बाजूला उतरत होत्या, ती जागा आता रस्त्यात गेली आहे. मागे सरकायचे तर ती जागासुद्धा पिढ्यान् पिढ्या कुणाची तरी ठरलेली आहे. त्यापलीकडे बागायती शेती आहे. ज्या दिंड्यांच्या राहुट्यांची जागा रस्त्यामध्ये गेली, त्यांनी कुठे तंबू ठोकायचे, हा प्रश्न आहे.
माऊली, या दुभाजकाचं कसं करायचं?
माउली! या महामार्गाला दुभाजक आहेत. त्यामुळे एका मार्गाने वाहने आणि एका मार्गाने दिंड्या अशी वाटचाल केली जाईल; पण एखाद्या दिंडीचा विरुद्ध बाजूला मुक्काम असेल आणि दुभाजक असेल तर त्यांनी रस्ता कसा ओलांडायचा. तेव्हा रस्ता ओलांडताना दुभाजक व वाहतुकीचा अडथळा जाणवणार आहे.
महागाईची झळ
मुखाने हरिनाम घेत वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या मुखात दोन घास घालणारे अन्नदाते भरपूर आहेत; पण यंदा महागाईच इतकी वाढली आहे की, पंगत देणारे व दानशूरांनाही आपल्या अन्नदानाच्या बजेटमध्ये वाढ करावी लागणार आहे. डिझेलचे दर वाढले. वाहनचालकांचा पगार वाढला. त्यामुळे दिंडीकऱ्यांना ट्रकसाठीही आता चांगलेच भाडे मोजावे लागत आहे.