मुंबई : घटस्थापनेआधीच रविवारच्या मुहूर्तावर मुंबईतील नवरात्रौत्सव मंडळांनी मोठ्या जल्लोषात माऊलींचे आगमन केले. ढोल ताशांच्या गजरात मंडपांकडे रवाना होणाऱ्या देवींच्या स्वागतासाठी वरुणराजाच्या हलक्या सरींनीही हजेरी लावली होती.मंगळवारपासून आश्र्विन मासारंभ होत असून नवरात्रारंभ होणार आहे. मात्र रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत बहुतेक मंडळांनी दोन दिवस आधीच मोठ्या थाटामाटात देवीचे आगमन केले. गिरणगावातील जुने मंडळ असलेल्या धाकू प्रभूजी वाडी सार्वजनिक मंडळाच्या ‘डी.पी. वाडीच्या माउली’च्या आगमन सोहळ््याला मंडळाने ५१ ढोल आणि ताशांची आरास लावली होती. ढोल ताशांच्या तालावर पारंपरिक पद्धतीने दरवर्षी माउलीचे आगमन होत असल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी अशोक विचारे यांनी दिली. ढोल पथकांसह आगमनावेळी डीजेही लावण्यात आला होता. मंडळाने यंदा देवीच्या आगमनासाठी विशेष गीत तयार केले आहे. केवळ ते गीत वाजवण्यासाठी आगमन सोहळ््यात डीजे लावल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, लालबाग, परळ, माझगाव, भायखळा परिसरांत मोठ्या संख्येने मंडळांनी देवीचा आगमन सोहळा ठेवला होता. यावेळी एकाच रंगांचे टी-शर्ट परिधान केलेले कार्यकर्ते तसेच गणेशोत्सवाप्रमाणे नाक्यानाक्यांवर आगमन सोहळ््याची वेळ दाखवणारे बॅनर झळकत होते.
रविवारच्या मुहूर्तावर माऊलींचे आगमन
By admin | Published: October 12, 2015 4:57 AM