Join us

माऊलींच्या पालख्या 'एसटी'ने पंढरीत दाखल   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 9:14 PM

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी अत्यंत मोजक्या वारकरी बंधूंच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात येणार आहे.

मुंबई :विठू माऊलीच्या दर्शनाला, आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील मानाच्या पालख्या निवडक वारकऱ्यांसह एसटीने दिमाखात पंढरी नगरीमध्ये दाखल झाल्या आहेत.

राज्य सरकारने  दिलेल्या निर्देशानुसार कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी अत्यंत मोजक्या वारकरी बंधूंच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात येणार आहे. अशावेळी आषाढी एकादशीला परंपरेने चाललेल्या राज्यभरातील विविध तिर्थक्षेत्रांवरून मानाच्या पालख्या या थेट पंढरपूर मध्ये आणण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळावर जबाबदारी टाकली होती.

त्यानुसार देहू येथून संत तुकाराम, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर, सासवड येथून संत चांगवटेश्वर व संत सोपानदेव , नेवासा येथून संत मुक्ताई , त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ पंढरपुरातुन संत नामदेव यांच्या पालख्या एसटीच्या शिवनेरी, शिवशाही,लालपरी अशा विविध बसमधून  निवडक वारकरी बंधूंसह आज सकाळी पंढरपूरकडे निघाल्या. वाटेमध्ये अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनतेने या पालख्यांचे दर्शन घेत फुले वाहिली.

मंगळवारी सायंकाळी या सर्व पालख्या पंढरी नगरीमध्ये येऊन दाखल झाल्या आहेत. 'दरवर्षी आषाढी एकादशीला  लाखो वारकरीची सेवा करणाऱ्यांचे दायित्व एसटीने अगदी जबाबदारीने पार पाडले आहे. यंदा माऊलीच्या मानाच्या पालख्या नेण्याचे भाग्य एसटीला मिळाले, हा एसटीचा बहुमान  समजला पाहिजे, असे गौरवोद्गार परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष  अनिल परब यांनी काढले. 

टॅग्स :पंढरपूरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसआषाढी एकादशी