- संकेत सातोपे, मुंबईएखाद्या नाक्यावर किंवा रेल्वेस्थानकाच्या कोपऱ्यावर बोलू न शकणाऱ्या काही जणांचा ‘संवाद’ सुरू असल्याचे दृश्य कधीतरी आपल्या नजरेस पडते. हातवाऱ्यांच्या माध्यमातून चालणाऱ्या या संवादाकडे अनेक जण कौतुकाने, तर काही टिंगलेनेही पाहात असतात. या पलिकडे आपल्याला या विशेष मुलांच्या आयुष्याची माहिती नसते. या मुलांचे शिक्षण कसे होते, त्यांच्या रोजगाराचे - भविष्याचे काय, असे प्रश्न घरात अशी विशेष व्यक्ती असल्याविना फारसे कुणाला पडत नाहीत. या मुलांच्या पालकांपुढे मात्र हे प्रश्न सतत आ वासून उभे असतात. त्यांचे हे प्रश्न काही प्रमाणात सोडविण्याचा प्रयत्न मुंबईतील काही तरुण उद्योजकांनी केला आहे. विशेष मुलांच्या याच ‘विशेषतेचा’ वापर करून त्यांनी मुंबईतील पवई या उच्चभ्रु वस्तीत एक वैशिष्ट्यपूर्ण रेस्टॉरंटसाठी सुरू केले आहे.राजन चक्रवर्ती, अनुज शहा आणि प्रशांत अस्सर या तरुणांनी एकत्र येत शिरीष गुरले आणि राजशेखर रेड्डी या गुंतवणूकदारांच्या साहाय्याने मे २०१५ मध्ये ‘मिर्ची अॅण्ड माइम’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले. या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्वच्या सर्व सर्व्हिस स्टाफ मुकबधीर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला हातवारे करून खाद्यपदार्थांची आॅर्डर द्यावी लागते. त्यासाठी येथील मेन्यू कार्डवर प्रत्येक पदाथार्पुढे त्याच्या किमतीसोबतच तो पदार्थ मागविण्यासाठी हातवाऱ्यांचे चिन्हही दाखविण्यात आले आहे. तशा प्रकारचे हातवारे करून पदार्थ मागवायचे असतात. विशेष म्हणजे अभिनव संकल्पनेवर आधारित या रेस्टॉरंटला ग्राहकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. कोणतीही जाहिरात न करता रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच येथील दुपार आणि रात्रीच्या जेवणाच्या जागा हाऊस फुल होऊ लागल्या. त्यामुळे येथे आता एक दिवसांची आगाऊ नोंदणी केल्याविना जाता येणेही अशक्य झाले आहे.कॅनडामधील अशा प्रकारच्या एका रेस्टॉरंटपासून प्रेरणा घेऊन हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला राजन, अनुज आणि प्रशांत स्वत: मुकबधिरांची संकेत भाषा शिकले. त्यानंतर मुंबईतील चेंबूरच्या रोटीराम थडानी शाळेतील मुकबधीर मुलांची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. या विशेष मुलांचे पालक मुलांची खूपच काळजी करीत असतात, सुरुवातीला काही पालकांनी मुलांना हॉटेलसाठी काम करू देण्यास नकार दिला होता, परंतु शेवटी त्यांची समजूत काढण्यात यश आले, असे प्रशांत अस्सर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. त्यानंतर या मुलांना आठ आठवड्यांचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले आणि पुढचे ३ आठवडे अनेक ओळखीच्या लोकांना बोलावून विनामूल्य जेवण देण्यात आले. त्यामुळे या मुलांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला.आजघडीला २४ मुकबधीर तरुण ‘मिर्ची अॅण्ड माइम’मध्ये काम करत आहेत. त्यापैकी ४ मुली आहेत. बाहेरील कोणत्याही रेस्टॉरंट स्टाफपेक्षा या तरुणांना ३५ टक्के अधिक वेतन देण्यात येत आहे. तसेच येत्या वर्षात त्यांना रेस्टॉरंटचे काही समभाग देऊन अंशत: मालकीही देण्यात येणार आहे. त्यामुळे आजपर्यंत परावलंबी आयुष्य जगणाऱ्या या विशेष मुलांचे आयुष्य खऱ्या अथार्ने मार्गी लागले आहे.या मुलांकडे हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असणारे काही गुण उपजतच असतात. ही मुलं इतरांपेक्षा अधिक हसमुख असतात. अधिक मनकवडे असतात आणि त्यांच्या कामावर त्यांचे पूर्ण लक्ष असते. त्यामुळे केवळ सहानुभूती म्हणून नव्हे, तर हॉटेल व्यवसायसाठी उपयुक्त असलेल्या त्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांना या व्यवसायात आणल्याचे प्रशांत म्हणाले. तसेच येत्या काळात अशा प्रकारची २१ रेस्टॉरंट सुरू करण्याचा आणि त्यापैकी ३ भारताबाहेर सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. दिल्ली, बंगरुळू, पुणे अशा अनेक मोठ्या शहरांत ही रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार असून त्यासाठी त्या- त्या शहरांतील मुकबधीर मुलांना प्रशिक्षण देऊन नियुक्त करण्यात येणार आहे, असे प्रशांत यांनी सांगितले.
गजबजलेल्या मुंबई नगरीत रेस्टॉरंटमध्ये ‘मौन’ पंगत
By admin | Published: May 02, 2016 12:11 AM