मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तांकडून चौकशी सुरू...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:10 AM2017-07-29T05:10:59+5:302017-07-29T05:11:02+5:30
जुन्या इमारतीत सुरू असलेल्या अवैध गर्ल्स हॉस्टेलचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर, पालिकेने दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल
मुंबई : जुन्या इमारतीत सुरू असलेल्या अवैध गर्ल्स हॉस्टेलचा ‘लोकमत’ने पर्दाफाश केल्यानंतर, पालिकेने दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सी विभागाचे सहायक आयुक्त जिवक संतोष घेगडमल यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमुना इमारतीत, गेल्या पाच वर्षांपासून टेरेसवरच अवैध बांधकाम करत, गर्ल्स हॉस्टेल सुरू केल्याचे दिसले. चिंचोळी वाट, त्यात तब्बल १८ खोल्या काढण्यात आल्या होत्या. आतून प्रशस्त वाटत असले, तरी याच गर्ल्स हॉस्टेलच्या डोक्यावर तीन मोबाइल टॉवर उभारण्यात आले आहेत, तसेच अन्य सुरक्षेच्या दृष्टीनेही दुर्लक्ष केलेले दिसले.
मुंबईत सहज घर उपलब्ध होत नसल्याने, तरुणी जास्तीचे पैसे देऊन या ठिकाणी राहताना दिसल्या. तब्बल १३ हजार रुपये एका खोलीसाठी या देत आहेत. त्यामुळे मुलींकडून पैशांची लूट करत, या मंडळींची लाखोंनी सुरू असलेली कमाई या स्टिंगमधून समोर आली.
शुक्रवारी ‘लोकमत’ने जमुना इमारतीतील अवैध गर्ल्स हॉस्टेलचा पर्दाफाश केला. याची दखल घेत, सी विभागाचे सहायक आयुक्त जिवक संतोष घेगडमल यांनी या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती योग्य ती कारवाई येत्या सोमवारपर्यंत करण्यात येणार असल्याचे सांगितले. या इमारतीने तब्बल ७८ लाख ७९ हजार ८५९ रुपयांचे मालमत्ता करही थकविल्याचे माहिती अधिकारातून समोर आले. याबाबत जमुना इमारतीचे जागामालक सोहेल वझीफदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती जागा जरी टेरेसची असली, तरी त्या ठिकाणी मी अधिकृत खोली बांधल्या आहेत. ते ‘गर्ल्स हॉस्टेल’ नसून, ‘पेइंग गेस्ट’ असल्याचे त्याचे म्हणणे आहे.