मुंबई विद्यापीठाकडे उरले २४ तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 03:20 AM2017-07-30T03:20:53+5:302017-07-30T19:43:58+5:30
मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेल्या ३१ जुलैच्या डेडलाइनला आता अवघे २४ तास उरले आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेल्या ३१ जुलैच्या डेडलाइनला आता अवघे २४ तास उरले आहेत. या रविवारच्या २४ तासांत तब्बल ३ लाख ३५ हजार उत्तरपत्रिका तपासून सोमवारी निकाल जाहीर करण्याचे आव्हान मुंबई विद्यापीठासमोर आहे.
वाणिज्य शाखेच्या तब्बल २ लाख ७१ हजार ७०० उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. त्यामुळे आता वाणिज्य शाखेचा निकाल वेळेत जाहीर होणार का याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी कला शाखेच्या उत्तरपत्रिका तपासणीबाबत विद्यापीठाने कोणताही तपशील अजून उघड केलेला नाही.
शनिवारी एकूण ७० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३३ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून, ३७ हजार उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन पूर्ण झाले आहे. विज्ञान शाखेनंतर आता मुंबई विद्यापीठाने वाणिज्य शाखेवर लक्ष केंद्रित केले आहे. वाणिज्य शाखेच्या तब्बल ५ लाख ६४ हजार २२४ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. तर, २ लाख ७१ हजार ७०० उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. शनिवारी वाणिज्य शाखेच्या फक्त १९ हजार ७२५ उत्तरपत्रिकांची तपासणी झाली असून, २३ हजार ६६३ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन पूर्ण झाल्याची माहिती विशेष अधिकारी विनायक दळवी यांनी दिली.
निकाल वेळेत लागावे म्हणून मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना सुटी दिली आहे. पण, यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आॅफलाइन पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी केली जात असताना, एप्रिल अथवा मे महिन्यात उत्तरपत्रिकांची तपासणी सुरूव्हायची. पण, यंदा निविदा प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने उत्तरपत्रिका तपासणीसाठी जून महिना उजाडला होता. त्यामुळे आता निकालाची प्रतीक्षा करून विद्यार्थी आणि पालकांवरचा ताण वाढत आहे.
शुक्रवारी एकही निकाल जाहीर नाही
राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा आढावा
घेण्यासाठी मंगळवार, २५ जुलैला बैठक घेतली होती. त्यानंतर
दोन दिवसांत विद्यापीठाने ४७७ पैकी १२१ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले. पण, शुक्रवारी विद्यापीठाने एकही निकाल जाहीर केला नाही. आता दोन दिवसांत ३५६ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करायचे आहेत.
प्राध्यापकांना गेल्या आठवड्यापासून
सकाळी ७ वाजल्यापासून कॅप सेंटरमध्ये उत्तरपत्रिका तपासणीसाठी जाऊन बसावे लागते. त्यातच अजूनही येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि मॉडरेशन करताना प्राध्यापकांचा कस लागतो आहे.
कुलगुरूंची हकालपट्टी करा
मुंबई : विद्यमान कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनीदेखील गुरुदक्षिणा म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला मुंबई विद्यापीठाशी संलग्न संशोधन संस्था म्हणून मान्यता दिली, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.राज्यपालांनी देशमुख यांची हकालपट्टी करावी. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही जबाबदारी स्वीकारून पायउतार व्हावे, असे सावंत म्हणाले.
मुंबई विद्यापीठाच्याउत्तपत्रिका तपासणीला गती
कोल्हापूर : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी शिवाजी विद्यापीठातर्फे तीन केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने सुरू आहे. तांत्रिक अडचणीमुळे शुक्रवारी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू होऊ शकले नव्हते. मात्र शनिवारी उत्तरपत्रिका तपासणीला थोडी गती आली.