लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाळ्यात वाढणाऱ्या लेप्टोस्पायरोसिस या आजाराचे मूळच नष्ट करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यानुसार जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्यांच्या कालावधीत ८१ हजार ५० मूषकांचा संहार करण्यात आला आहे. मात्र उंदराच्या एका जोडीपासून वर्षभरात १५ हजार उंदीर जन्माला येत असल्यामुळे ‘मूषक नियंत्रण’ हे पालिकेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. उंदीर वा घुशी यांचे आयुर्मान साधारणपणे १८ महिन्यांचे असते. गर्भधारणेनंतर २१ ते २२ दिवसांत मादी उंदीर आपल्या पिल्लांना जन्म देते. एका वेळेस ५ ते १४ पिल्लांना ती जन्म देते. ही पिल्ले पाच आठवड्यांत प्रजननक्षम होऊन तीदेखील नव्या पिल्लांना जन्म देतात. ज्यामुळे उंदरांचे प्रजनन अनेक पटीत वाढत जाते. यानुसार साधारणपणे एका वर्षात उंदराच्या एका जोडीमुळे अंदाजे १५ हजारपर्यंत नवीन उंदीर तयार होऊ शकतात.उंदीर वा घुशींमुळे होणाऱ्या रोगांमध्ये प्लेग व लेप्टोस्पायरोसिस यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘झिनॉपसिला चिओपिस’ या पिसवा उंदीर-घुशींच्या केसात आढळतात. या पिसवांमार्फत प्लेगची लागण होते, तर लेप्टोस्पायरोसिस जिवाणू अनेक प्रकारच्या चतुष्पाद प्राण्यांच्या मूत्राद्वारे जमिनीवर, अन्नपदार्थांवर अथवा पाण्यात मिसळले जाऊ शकतात. या चतुष्पाद प्राण्यांमध्ये उंदरांचाही समावेश होतो. लेप्टोस्पायरोसिसने बाधित असलेल्या प्राण्याचे मलमूत्र माती, पाणी, अन्न, पेयजले इत्यादींच्या संपर्कात आल्यास जखमेद्वारे अथवा तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचे जिवाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात.प्रतिबंधात्मक उपाययोजनापावसाळ्यात पूर परिस्थितीची शक्यता व उंदरांचा प्रादुर्भाव आढळतो, अशा ठिकाणी विषारी गोळ्या टाकून तसेच रात्रपाळी संहारणाद्वारे उंदीर नियंत्रणाचे काम नियमितपणे करण्यात येते. त्याव्यतिरिक्त दैनंदिन तक्रारीच्या अनुषंगाने तसेच विभागात उंदरांचा प्रादुर्भाव असलेल्या मार्केटच्या सभोवतालचा परिसर, गलिच्छ वस्त्या इत्यादी ठिकाणी विषारी गोळ्या टाकणे इत्यादी प्रकारे उंदीर नियंत्रणाचे काम व उंदीरनाशक मोहीम पालिकेने सुरू ठेवलेली आहे.वेगाने वाढणाऱ्या उंदरांच्या व घुशींच्या संख्येस शहरीकरणातील अनेक घटक कारणीभूत असतात. स्वच्छतेचा अभाव, उघड्यावर अन्नपदार्थ विकणारे विक्रेते व कुठेही कचरा फेकण्याची अनेकांची सवय आणि त्यातून उंदरांना सहजपणे मिळणारे अन्न यामुळे उंदरांची संख्या वाढण्यास हातभार लागतो. असे पकडले जातात उंदीर : महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत मूषक नियंत्रणाचे काम प्रामुख्याने चार पद्धतीने केले जाते. त्यात उंदीर पकडण्यासाठी सापळे लावणे, बिळांमध्ये विषारी गोळ्या टाकणे तसेच रात्रीच्या वेळी काठीने उंदीर मारणे या चार पद्धतींचा समावेश होतो. या पद्धतींद्वारे जानेवारी ते डिसेंबर २०१६ या एक वर्षाच्या कालावधीत दोन लाख १० हजार ७३७ उंदीर मारण्यात आले. त्याचबरोबर या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत एकूण ८१,०५० उंदीर मारण्यात आले असल्याची माहिती कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली. उंदरांना रोखण्यासाठी हे करा... उंदीर व घुशींच्या संख्येवर प्रभावी नियंत्रणासाठी आपल्या घराच्या व आसपासच्या जागेमध्ये स्वच्छता नियमितपणे राखणे आवश्यक आहे. घरामध्ये आणि इमारतीमध्ये मूषकरोधक बसविणे तसेच उंदीर घरात शिरू नयेत, यासाठी दरवाजाबाहेर दगडी उंबरठा बसविणे.
लेप्टोचा धोका टाळण्यासाठी मूषकसंहार
By admin | Published: May 31, 2017 6:45 AM