मविआचे अपयश आमच्या माथी मारू नये, प्रकल्पांवरून सरकारचा प्रतिहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 06:58 AM2022-11-13T06:58:32+5:302022-11-13T07:00:42+5:30
Shinde-Fadanvis Government: दोन-तीन महिन्यांत एखादा उद्योग येतो किंवा जातो, असे कधी घडले आहे का? ही काही जादूची कांडी नाही. फिरवली की इकडे उद्योग आला आणि तिकडे उद्योग गेला. आरोप करायचे तर कुणीही आरोप करू शकतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी येथे म्हणाले.
उद्योग येणे - जाणे ही काही जादूची कांडी नाही
नागपूर : दोन-तीन महिन्यांत एखादा उद्योग येतो किंवा जातो, असे कधी घडले आहे का? ही काही जादूची कांडी नाही. फिरवली की इकडे उद्योग आला आणि तिकडे उद्योग गेला. आरोप करायचे तर कुणीही आरोप करू शकतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी येथे म्हणाले. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन या प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारले असता ते बोलत होते.
विकासकामांना प्राधान्य देणारे आमचे सरकार आहे. उद्योगाला चालना देणारे, उद्योगांना प्रोत्साहन देणारे सरकार आहे. जे प्रकल्प थांबले त्यांना पुढे नेणे याला आमचे प्राधान्य असून राज्यात लवकरच मोठे उद्योगही येतील, असा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. भंडारा येथील एकदिवसीय दौऱ्यावर जाताना विमानतळावर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केंद्र सरकारने आम्हाला रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारने २ लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या विकासकामांसाठी मंजूर केले आहेत. त्यामुळे आमचे सरकार हे विकासाभिमुख असल्याचेही ते म्हणाले.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतचे काम पूर्ण तयार आहे. लवकरच या महामार्गाचे लोकार्पण होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
मविआचे अपयश आमच्या माथी मारू नये - उपमुख्यमंत्री
नागपूर/मुंबई : ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प गेला, अशा चुकीच्या गोष्टी कुणीही प्रसारित करू नये. ही सर्व टाइमलाइन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्पाचे तीन पार्ट असतील, दोन पार्टची घोषणा होणे बाकी आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गेल्याचा कांगावा करणे चुकीचे आहे. कुठलीही माहिती न घेता महाविकास आघाडीचे अपयश आमच्या माथी मारू नये, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी नागपूर विमानतळावर बोलताना व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या फेब्रुवारी २०२२ अर्थसंकल्पात २०२२-२३ या वर्षासाठी ऊर्जा उपकरण निर्मिती झोनची घोषणा करण्यात आली होती. याची अधिसूचना १३ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. राज्यांनी प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख ८ जून २०२२ होती. ही सगळी टाईमलाईन बघता हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात गेल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. कांगावा करणे ही जितेंद्र आव्हाड यांची स्टाइलच आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसह थिएटरमध्ये तमाशा केला, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली. त्यावरून पोलिसांनी अटक केली. कुणीही कायदा हातात घेतला असता, तर कायद्यानुसारच हीच कारवाई झाली असती, असे ते म्हणाले.