Join us  

पालकांनो सावध व्हा! शाळेबाहेर मिळतोय एमडी, मावा, हुक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 4:59 AM

मुलांबरोबर मुलीही वेगवेगळ्या नशेच्या आहारी गेल्याचे धक्कादायक वास्तव

रेश्मा शिवडेकर

मुंबई : शाळेबाहेरील पानाच्या, चण्या-शेंगदाण्याच्या टपऱ्याच नव्हे तर वडापावच्या गाड्यांवरही सर्रास मावा, गुटखा, हुक्का किट्स, एमडी मिळू लागल्याने शिक्षकांची चिंता वाढली आहे. शाळा एखाद्या लहान वस्तीतील असो वा उच्चभ्रू, वरून पेनासारखी दिसणारी ई-सिगरेट अनेक विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसू लागली आहे. मुलांबरोबर मुलीही वेगवेगळ्या नशेच्या आहारी गेल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदवले.

‘ही मुले त्यांच्या डोळ्यांवरूनच ओळखू येतात. त्यांचे डोळे, ओठ पिवळसर झालेले दिसतात. डोळ्यांत तेजाचा अभाव, बोटांची एरवी गुलाबी दिसणारी नखे, बोटे पिवळसर पडलेली वा खडबडीत झालेली. अशी लक्षणे दिसली की समजावे हा मुलगा नशेच्या आहारी गेला आहे. एरवी तंद्रीत वा झोपाळलेली दिसली तरी ती अचानक आक्रमक होतात व शिक्षकांवर हल्लेही करतात,’ असा अनुभव शिक्षक व समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी सांगितला.

हुक्क्याचा फिल देणारे स्प्रे किट्स हा एक प्रकार मुलांकडे आढळून येतो. हे किट्स ऑनलाइनही सहज उपलब्ध होतात.

मराठवाड्यात मावा तर विदर्भात खर्रा

तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश असलेला मावा मराठवाड्यात सर्रास मिळतो. तर विदर्भात हा प्रकार खर्रा म्हणून कुप्रसिद्ध आहे.

मुलांना नशेची सवय लागावी म्हणून...

 शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकू नये, असा नियम आहे. परंतु, तो पायदळी तुडवला जातो. काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेला हल्ला ही याच ‘रॅकेट’ची परिणती होती.

 शाळेजवळ मावा विकणाऱ्या एका टपरीच्या विक्रेत्याविरोधात कुलकर्णी यांनी तक्रार केली होती. त्याचे उत्तर त्यांना मारहाण करून दिले गेले.

 ‘मुलांना नशेची सवय लागावी यासाठी आधी त्यांच्या हातावर चिमूटभर मावा टेकवला जातो. हळूहळू त्याला त्याची सवय जडते,’ असा अनुभव कुलकर्णी यांनी सांगितला. या सगळ्याला आळा घालण्यासाठी पालिका व पोलिसांनी एकत्र येऊन या विक्रेत्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

  ‘मुलांना हेरण्यासाठी शाळेजवळच्या तंबाखू, चणे-शेंगदाण्याच्या टपऱ्यांवर पद्धतशीरपणे सापळा रचलेला असतो. अगदी वडापाव विक्रेत्यांकडेही त्यांना ड्रग्ज किंवा तत्सम नशेचे साहित्य मिळते. ड्रग्ज पुरविणाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या लिंक्सही येथूनच पुरवल्या जातात.

  हे रॅकेट इतके जबरदस्त असते की मुख्याध्यापक, शिक्षकही त्यांच्याविरोधात तक्रार करायला धजावत नाहीत,’ अशी प्रतिक्रिया एका मुख्याध्यापकांनी दिली.