एमपीएससी परीक्षांना आता कमाल संधीची मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:08 AM2020-12-31T04:08:04+5:302020-12-31T04:08:04+5:30
खुल्या प्रवर्गातील उमेदवार ६ तर मागास प्रवर्गातील ९ वेळा परीक्षा देऊ शकणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा ...
खुल्या प्रवर्गातील उमेदवार ६ तर मागास प्रवर्गातील ९ वेळा परीक्षा देऊ शकणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उमेदवारांसाठी प्रवर्गानुसार कमाल संधीची मर्यादा निश्चित केली. त्यानुसार, यापुढे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीतजास्त ६ वेळा, तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त ९ वेळा परीक्षा देता येईल. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही.
पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे बदल लागू असतील. सोबतच जर उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतला असेल, तर त्याचा एक अटेम्प्ट नोंदविला जाईल, तसेच पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उमेदवाराने हजेरी लावली, तर त्याची ही संधी यापुढे ग्राह्य धरली जाईल. महत्त्वाचे म्हणजे उमेदवार कोणत्याही कारणात्सव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरला किंवा त्याची उमेदवारी रद्द झाली, तरीही त्याची परीक्षेस उपस्थितीची संधी यापुढे गणली जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी ही माहिती दिली.
...............................