मुंबई :मुंबईसह राज्यभरात नोंदविण्यात येणाऱ्या कमाल तापमानाने नागरिकांचा जीव काढला असून, शुक्रवारी तर जळगाव येथे कमाल तापमानाची नोंद ४५.४ अंश सेल्सियस झाली आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर असले तरी वाढती आर्द्रता मुंबईकरांना घामाघूम करत आहे.
मुंबईकरांची रात्रही दिवसाइतकीच उष्ण नोंदविण्यात येत आहे. मुंबईसह राज्यात शनिवार उष्णच राहणार असून, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील. दुपारी आणि सायंकाळी आकाश निरभ्र राहील. विदर्भातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भातील जिल्ह्यांत उष्णतेची लाट राहील. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत वादळी पाऊस पडेल.
कमी दाबाचे क्षेत्र-
दक्षिण पूर्व अरबी समुद्रात केरळनजीक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, वाऱ्याचा प्रवाह यामुळे मान्सूनसाठी मजबूत होऊ शकतो. - कृष्णानंद होसाळीकर, प्रमुख, पुणे, भारतीय हवामानशास्त्र विभाग
मान्सून रखडणार-
जोपर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र अस्तित्वात असेल, तोपर्यंत मान्सूनची प्रगती रखडणार. केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार नाही. हे कमी दाबाचे क्षेत्र या आठवड्याच्या अखेरीस ओसरण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात मान्सूनची प्रगती पुन्हा सुरू होईल.- अथ्रेया शेट्टी, हवामान अभ्यासक