Join us

तापमानाची कमाल... मुंबईकर हैराण; शहराचा पारा ३७ अंशांवर, उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 8:13 AM

 ठाणे-कल्याण ४१ ; आजही उकाडा राहणार कायम 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात उष्णतेच्या लाटेने झाली. सोमवारी मुंबईच्या तापमानात अचानक चार अंश सेल्सिअसची वाढ झाल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. शहराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस होते, तर ठाणे आणि कल्याणमध्ये पारा चाळिशीपुढे गेल्याची नोंद झाली. आज, मंगळवारीही हेच चित्र असेल, असा होरा आहे. डोक्यावर आग ओकणारा सूर्य, तापलेले रस्ते, लोकलमध्ये लागणाऱ्या उष्णतेच्या झळा आणि ३७ अंश नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची सोमवारी लाहीलाही झाली. उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईचे कमाल तापमान थेट ३३ वरून ३७ अंशांवर गेल्याने अंगाची लाहीलाही झालेला मुंबईकर हैराण झाला होता. 

मुंबईत काही पहिल्यांदा उष्णतेची लाट आलेली नाही. उन्हाळी हंगामात उष्णतेच्या लाटा धडकत असतात. या वर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक तापमान देशभरात नोंदविण्यात येईल. उष्णतेच्या लाटांचे दिवसही सरासरीपेक्षा अधिक असू शकतात, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.      

मुंबई समुद्रसपाटीपासून किंचित खाली आहे. इराण, अफगाणिस्तान आणि दक्षिण पाकिस्तानातून गुजरातमार्गे मुंबईत दाखल होणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे मुंबईमधील उष्णता वाढते आहे. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशात सोमवारी उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती होती. मंगळवारीही मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ ते ३९ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल. - मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग.

गेल्या १० वर्षांत किती होते तापमानवर्ष     दिनांक     तापमान

  • २०२३    २०     ३८.८
  • २०२२     २२     ३८.९
  • २०२१    ७     ३५.८
  • २०२०     २१     ३७.८
  • २०१९    १४     ३६.३
  • २०१८     २३    ३६.१
  • २०१७     १९     ३६
  • २०१६     २८     ३८
  • २०१५    २२     ३५.३
  • २०१४     २२    ३९

कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये

  • ठाणे     ४१ 
  • मुंबई     ३७.९ 
  • कोल्हापूर     ३९ 
  • सातारा     ४०.१ 
  • सांगली     ३९.६ 
  • जळगाव     ४१.५ 
  • अहमदनगर     ४०.८ 
  • छत्रपती संभाजी नगर     ३९.३ 
  • बारामती     ३९.१ 
  • उदगीर     ३७.८ 
  • नाशिक     ४०.४ 
  • पुणे     ४०.८ 
  • परभणी     ३९.५ 
  • मालेगाव     ४२.६ 
  • सोलापूर     ४०.६ 
  • नांदेड     ३८.६ 
  • जेऊर     ४१.५ 
  • धाराशिव     ३९.५
टॅग्स :मुंबई