मुंबई : राज्याप्रमाणेच आता मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. रविवारी राज्यात सर्वात कमाल तापमान जळगाव येथे ४२.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश नोंदविण्यात आले आहे. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश नोंदविण्यात आले होते. मुंबईच्या कमाल तापमानात १ अंशाची वाढ झाली आहे. दरम्यान, आता वाढत्या कमाल तापमानामुळे राज्याची होरपळ होत असून, सोमवारी मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे.मध्य महाराष्ट्रात सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश नोंदविण्यात येईल; आकाश स्वच्छ राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.दरम्यान, शनिवारी बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३९ अंशाच्या घरात नोंदविण्यात आले. जळगाव येथे ४१.१ अंश सेल्सिअस एवढया कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईचे कमाल तापमान ३४.८ अंश नोंदविण्यात आले होते. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास आहे. मराठवाड्यात अधिकाधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. यापूर्वी मालेगाव, सोलापूर येथे कमाल तापमान सातत्याने ४० अंश नोंदविण्यात येत आहे.प्रदूषण घटलेमुंबईकरांना दिलासादायक बातमी म्हणजे कोरोनाला थोपविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मुंबईच्या प्रदूषणात सातत्याने चांगलीच घट नोंदविण्यात येत आहे.