मुंबई : मुंबई शहरासह उपनगरातील नागरिकांना उन्हाचा तडाखा बसत असतानाच, दुसरीकडे राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाने कहर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील अनेक शहरांचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांच्या घरात नोंदविण्यात येत असून, पुढील चार दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. परिणामी, पारा आणखी वाढणार असून, मुंबईसह राज्य होरपळणार आहे.राज्यात मंगळवारी सर्वात जास्त कमाल तापमान अहमदनगर व सोलापूर येथे ३७.१ तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १३ अंश नोंदविण्यात आले. ६ ते ९ मार्चदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, १९ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.काही शहरांचे मंगळवारचे कमाल तापमानपुणे, जळगाव, मालेगाव, सातारा, औरंगाबाद या शहरांचे कमाल तापमान मंगळवारी ३३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. तर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वाशीम, वर्धा आणि यवतमाळ या शहरांचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सियसच्या घरात नोंदविण्यात आले आहे.
राज्यातील शहरांचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 6:16 AM