26/11 हल्ल्यातील दहशतवाद्यांचा कर्दनकाळ 'मॅक्स'चे निधन
By admin | Published: April 9, 2016 07:26 AM2016-04-09T07:26:36+5:302016-04-09T10:17:12+5:30
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात लढा देण्यात महत्वाची भूमिका निभावणा-या निवृत्त लॅब्रॅडोर कुत्रा मॅक्सचा काल मृत्यू झाला.
Next
डिप्पी वांकाणी,
मुंबई, दि. ९ - २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात लढा देण्यात महत्वाची भूमिका निभावणा-या निवृत्त लॅब्रॅडोर कुत्रा मॅक्सचा शुक्रवारी संध्याकाळी मृत्यू झाला. १२ वर्षांचा मॅक्स गेल्या अनेक वर्षांपासून बॉम्ब शोध व विल्हेवाट पथकात कार्यरत होता.
मॅक्सने २६/११ च्या हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी इतर अधिका-यांसोबत महत्वाची भूमिका बजावली. मुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांनी पेरलेल्या १० बॉम्बपैकी ३ बॉम्ब मॅक्सने शोधले होते. एप्रिल ते ऑक्टोबर २००५ ते दरम्यान मुंबई पोलिसांनी त्याला प्रशिक्षण दिल्यानंतर तो बॉम्ब सोध पथकात भरती झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१५ मे मध्ये तो निवृत्त झाल्यानंतर विरार येथे प्राणी मित्र फिजा शहांसोबत राहत होता, अशी माहिती माजी मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
'मॅक्स २६/११ हल्ल्यातील हिरो आहे, इतर अधिका-यांप्रमाणेच त्यानेही या हल्ल्यादरम्यान महत्वाची कामगिरी केली. कुलाब्यातील ताज हॉटेलसमोरील हँड ग्रेनेड्स सोधण्यात तेसच इतर शस्त्रास्त्रे शोधण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. पोलिस दलात सेवेसाठी त्याने व्यतीत केलेला काळ अतुलनीय होता.' ' मॅक्स निवृत्त झाला तेव्हाच त्याच्यासोबत आणखी दोन श्वान निवृत्त झाले. त्या तिघांनाही चांगल्या व्यक्तीकडे सोपवण्यात यावे, याकडे मी विशेष लक्ष दिले, असे मारियांनी नमूद केले.
२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह १९७ जण ठार झाले होते, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगांव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सी मध्ये स्फोट झाला.
पकडला गेलेला एकमेव दहशतवादी, अजमल आमीर कसाब, हा २६ नोव्हेंबरलाच पोलिसांच्या तावडीत जिवंत सापडला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व हल्लेखोर पाकिस्तानी होते, व या हल्ल्यांमागे लष्करे तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. भारतीय सरकारने कसाबचा कबुलीजबाब व त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठोस पुरावे गोळा केले, व ते अमेरिका व अन्य देशांना दिले. पाकिस्तानने आधी या प्रकरणी आपले हात झटकले, व कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचा इंकार केला. परंतु ७ जानेवारी २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या.