लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेला मालमत्ता वसुलीचे संपूर्ण उद्दिष्ट मार्च महिन्याअखेर गाठता आलेले नाही. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा लक्ष केंद्रित केले असून, २५ मेपर्यंत भरघोस महसूल तिजोरीत जमा होईल, अशी अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.२०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २५ मे हा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी मुदतीपूर्वी करभरणा करून संभाव्य दंडाची कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्यावतीने करवसुलीसाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. विभागीय स्तरावर कार्यालयीन दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करवसुलीचे कामकाज सुरू आहे. समाजमाध्यमांद्वारे संपर्क करून तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे कामकाज सुरू आहे, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘कर भरा, कारवाई टाळा’मालमत्ताधारकांना करभरणा करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने जनजागृती तसेच आवाहन करण्यात आले आहे. तथापि, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
थकबाकी असलेले ‘टॉप टेन’ मालमत्ताधारक
ओम ओमेगा शेल्टर (जी दक्षिण विभाग)- २० कोटी ४६ लाख ६९ हजार ५४५ रुपये शिवालिक व्हेंचर्स प्रा. लि (एच पूर्व विभाग)- १२ कोटी २८ लाख ९८ हजार १६ रुपये गोल्डन टोबॅको (के पश्चिम विभाग)- ११ कोटी ८४ लाख ८९ हजार ९८८ रुपये द वेस्टर्न इंडिया (जी उत्तर विभाग)- ०९ कोटी २१ लाख ४० हजार ४२५ रुपये समर्थ सिद्धार्थ शॉपिंग सेंटर ( पी दक्षिण विभाग)- ०६ कोटी ३७ लाख ५० हजार ०५ रुपये श्री. एम. बी. जुहूकर ( के पूर्व विभाग)- ०५ कोटी ५२ लाख ३० हजार ५०५ रुपये सुनील कन्स्ट्रक्शन (आर मध्य विभाग)- ०३ कोटी ०९ लाख ३३ हजार ६४४ रुपये द ट्रस्टी शरद एन (एम पूर्व विभाग)- ०२ कोटी ३५ लाख ८४ हजार ४४० रुपये अतुल प्रोजेक्ट इंडिया प्रा. लि. (टी विभाग)- ०२ कोटी २२ लाख ५६ हजार ७२९ रुपये अजंता कर्मवीर कन्स्ट्रक्शन (पी उत्तर विभाग)- ०२ कोटी ०३ लाख १७ हजार ५४१ रुपये