देवा, नवे वर्ष सुख, समाधान, समृद्धीचे जाऊ दे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:03 IST2025-01-02T14:03:36+5:302025-01-02T14:03:53+5:30
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविक बुधवारी पहाटेपासूनच रांगेत उभे होते. येथे आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी भाविकांना तीन ते चार तासांहून जास्त वेळ लागत होता.

देवा, नवे वर्ष सुख, समाधान, समृद्धीचे जाऊ दे...
मुंबई : नवे वर्ष सुख, समाधानाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ, अशी प्रार्थना परमेश्वराकडे करत मुंबईकरांनी नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली. यानिमित्ताने प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरासह, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर आणि दादर, गिरगावातील स्वामी समर्थांच्या मठात भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविक बुधवारी पहाटेपासूनच रांगेत उभे होते. येथे आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी भाविकांना तीन ते चार तासांहून जास्त वेळ लागत होता. महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिरात महिला भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिराच्या परिसरातही बॅरिकेड लावून रांगा हाताळण्यासाठी मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.
पहाटेपासून दुपारपर्यंत दर्शनासाठीच्या रांगा वाढत असतानाच भाविकांना सर्व सेवा वेळेत मिळाव्यात म्हणून मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. प्रभादेवी येथे भाविकांच्या रांगेमुळे वाहनांना अडसर होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही, अशी व्यवस्था सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आली होती.
दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत मुंबईतल्या प्रमुख मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी लागलेली रिघ कायम असल्याचे चित्र होते.