- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या विविध भागांतून लोक रोजीरेटीच्या शोधात मुंबई शहरामध्ये येत असतात. सर्वात जास्ती लोकसंख्येमध्ये मुंबईचा देशात दुसरा व जगात सातवा क्रमांक लागतो. देशात श्रीमंत महापालिका असलेल्या सुमारे 34000 कोटींचे एका राज्या इतके आर्थिक बजेट मुंबई महानगर पालिकेचे आहे.
मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देऊन वर्षभरात या मुंबई शहराचा कायापालट होणार असून विकासाचे अनेक मोठे प्रकल्प राबवण्याचे नियोजन आहे. या शहराला चांगल्या सोयी-सुविधा देणं हे आम्हा दोन्ही पालकमंत्र्यांचं कर्तव्य आहे. यासाठी उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे व मी या शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध आहोत असे ठोस आश्वासन मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लोकमतला दिली.येणाऱ्या काळात ट्राफिकच्या समस्येवर उपाय म्हणून टोकीयोच्या धर्तीवर सिग्नल व्यवस्था राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अस्लम शेख यांच्या दालनात मुंबई विकासाबाबत मुंबई महानगरपालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी व तज्ज्ञांच्या उपस्थितीत काल सादरीकरण करण्यात आले.यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ देखिल जारी केला. महानगपालिकेच्या प्रत्येक वाॅर्डमध्ये पाच नवीन रस्ते, पाच नवीन शौचालयं, दोन नवीन उड्डाणपुल, चार खाऊ गल्ली आणि जेवढे हेरिटेज परिसर आहेत तिथे पदपथ असं या विकासाचं स्वरुप असणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.या विकासाच्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी महानगरपालिकेच्या निधीबरोबरच सी.एस.आर निधीचा देखील मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार आहे.
एकट्या डी-वाॅर्डमधील विकास प्रकल्पांसाठी जवळपास तीस कोटींचे नियोजन आहे. ज्यामध्ये गिरगाव, वरळी, महालक्ष्मी मंदीर, हाजी हली येथील जास्त रहदारीचा परिसराचा समावेश आहे असे अस्लम शेख म्हणाले. पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर ओघ असणाऱ्या पर्यटन स्थळांच्या सुशोभिकरणावर व सुविधांवर देखील भर दिला जाणार आहे. तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर देखील सुशोभित करून मुंबईला एक सुंदर शहर बनविण्याचा मानस असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.