केमोथेरपीच्या वेदनांवर मायेची फुंकर; टाटा रुग्णालयात केमो केअर युनिटची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 06:11 AM2023-03-28T06:11:03+5:302023-03-28T06:11:21+5:30
टाटा रुग्णालयात हजारो केमोथेरपी दिल्या जातात. मात्र, केमोथेरपीनंतर घ्यावयाची काळजी अधिक गरजेची असते.
मुंबई : कॅन्सरग्रस्तांना बरे होण्यासाठी अनेक दिव्यांतून जावे लागते. त्यातीलच एक म्हणजे केमोथेरपी. कर्करोगाच्या पेशी शरीरात पसरू नये यासाठी त्या जाळल्या जातात. या उपचार पद्धतीला केमोथेरपी, असे संबोधले जाते. या उपचारांत रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. मात्र, आता रुग्णांच्या वेदनांवर मायेची फुंकर घातली जाणार आहे. केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांना तत्काळ दिलासा मिळावा याकरिता परळ येथील टाटा रुग्णालयात केमो केअर युनिटची स्थापना करण्यात आली आहे.
टाटा रुग्णालयात हजारो केमोथेरपी दिल्या जातात. मात्र, केमोथेरपीनंतर घ्यावयाची काळजी अधिक गरजेची असते. अनेक रुग्णांना केमोथेरपीचा त्रास होतो. त्याचे दुष्परिणाम शरीरावर जाणवतात. वेदना होतात. अशावेळी नेमके काय करावे, याची माहिती रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना नसते. अशावेळी योग्य सल्ला मिळाल्यास रुग्णांच्या वेदना कमी होतात. याच उद्देशातून केमो केअर युनिटची स्थापना करण्यात आली आहे.
कार्य कसे चालते?
रुग्णांना केमोथेरेपी सुरू केल्यानंतर केमो केअर युनिटचे दूरध्वनी क्रमांक दिले जातात. केमोथेरपी घेतल्यानंतर रुग्णांना त्रास जाणवल्यास ते कॉल करू शकतात. दूरध्वनीवर उपलब्ध असलेल्या परिचारिका रुग्णांचे म्हणणे ऐकून घेतात. तक्रार सौम्य/किरकोळ असल्यास, परिचारिका रुग्णांना योग्य जीवनशैली आणि आहारातील बदल किंवा मळमळ आणि उलट्या यासारख्या रुग्णांसाठी आधीच लिहून दिलेली औषधे घेण्याचा सल्ला देतात. तक्रारी गंभीर असल्यास रुग्णांना जवळच्या क्लिनिकला भेट देण्याचा वा टाटा रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णाने जवळच्या हॉस्पिटल वा दवाखान्याला भेट दिल्यास परिचारिका संबंधित रुग्णालयाशी समन्वय साधतात. तसेच रुग्णाचे तक्रारींचे निवारण झाले असल्याची खात्री करून घेतात.
दोन हजार रुग्णांना फायदा
ज्या रुग्णांना केमोथेरपीचे दुष्परिणाम जाणवतील त्यांना दूरध्वनीद्वारे योग्य तो सल्ला देणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकारण करणे हा युनिटचा मुख्य उद्देश आहे. याची सुरुवात ऑगस्ट २०२२ मध्ये करण्यात आली असून १० परिचारिकांना केमोथेरपी संबंधी दुष्परिणामांचे व्यवस्थापन करण्यासाठी दोन महिने प्रशिक्षण देण्यात आले. आतापर्यंत दोन हजार रुग्णांना या सुविधेचा लाभ झाला आहे.