कदाचित ती त्यांची पोटदुखी असेल; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 09:48 AM2020-07-25T09:48:46+5:302020-07-25T11:55:51+5:30
कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय इकडे मी लक्ष देत नाही. मी पुन:पुन्हा सांगतो की, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोले लगावले आहेत. देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीत आहेत तिथे ते तेथील कोरोनाची परिस्थिती पाहत असतील. कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली ही त्यांची पोटदुखी असू शकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातल्या परिस्थितीचे अपडेट्स त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून देणे कितपत योग्य आहे, अशा विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय इकडे मी लक्ष देत नाही. मी पुन:पुन्हा सांगतो की, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. यांचं ठिक आहे. हे बोलतील बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल, कारण कोरोनाची लक्षणं वेगवेगळी आहेत.
ताप येणं हेही कोरोनाचं लक्षण आहे. काही जणांची चव जाते. म्हणजे असे वेगळे काही तरी आढळतंय का हे पाहायला हवे, राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून अनेकांचं आयुष्य बेचव झालेलं असून शकतं, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना हे जागतिक संकट आहे. ही वेळ केवळ आपल्यावरच आलेली नाही. या संकटावर नेमकेपणाने बोलणारे किंवा सल्ला देणारे जगात कुणी नाही. एकीकडे लॉकडाऊनला विरोध करणारे शहाणे आहेत. लॉकडाऊनमुळे काय साधले, त्यामुळे अर्थव्यवस्थेवर संकट आले आहे, असा दावा केला जात आहे. मी लॉकडाऊन उघडून देतो. पण इथे लोक मृत्युमुखी पडले तर तुम्ही त्याची जबाबदारी घेणार का. आज जे दार उघडा म्हणून सरकारदरबारी बसलेत टाहो फोडताहेत, त्यांच्यासाठी दारे उघडायला हरकत नाही. पण दारं उघडल्यानंतर तुम्ही जबाबदारी घेणार का, अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाची जाणीव आम्हालाही आहेच.