मुंबई : प्र. ल. मयेकर हे उत्तम नाटककार तर होतेच, पण एक माणूस म्हणूनही ते चांगले होते. त्यांना विनोदाचा उत्तम सेन्स होता. ते एक ग्रेट व्यक्तिमत्त्व होते, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की ते माझे चांगले मित्र होते. ‘रोपट्रिक’ या त्यांच्या पहिल्या एकांकिकेपासून आमची मैत्री होती. त्यानंतर त्यांची ‘अतिथी’ ही एकांकिका मी दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केली होती आणि त्यात भूमिकाही केली होती. ‘रातराणी’ या त्यांच्या व्यावसायिक नाटकात मी काम केले होते. त्यांनी हे नाटक अप्रतिम लिहिले होते. या नाटकाच्या दौऱ्यावर ‘प्र. ल.’सुद्धा आमच्याबरोबर असायचे. त्यांच्या जाण्याने नाट्यसृष्टीची खूप मोठी हानी झाली आहे, असे पुळेकर म्हणाले.प्र. ल. मयेकर यांची नाट्यतंत्रावर अचूक पकड होती आणि त्यांची संवादलेखनाची हातोटी विलक्षण होती. ‘अथ मानूस जगन हं’, ‘मा अस साबरीन’ अशी त्यांची नाटके प्रायोगिक रंगभूमीवर गाजली. ‘मसीहा’, ‘काचघर’ असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. ‘मसीहा’ या त्यांच्या कथासंग्रहाला राज्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे.प्र. ल. मयेकर व्यावसायिक रंगभूमीवर आल्यावर ‘चंद्रलेखा’ नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा मोहन वाघ यांनी त्यांच्यातला ताकदीचा नाटककार अचूक हेरला आणि तिथून प्र. ल. मयेकर ‘चंद्रलेखा’मध्ये सामील झाले. या संस्थेतून त्यांनी ‘दीपस्तंभ’, ‘रमले मी’, ‘आसू आणि हसू’, ‘गोडगुलाबी’ अशी एकाहून एक सरस नाटके दिली. ही सगळी नाटके प्रचंड लोकप्रिय होत गेली आणि प्र.ल.मयेकर व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरस्थावर झाले. ‘अग्निपंख’, ‘रातराणी’, ‘रानभूल’, ‘पांडगो इलो रे बा इलो’ अशा त्यांच्या नाटकांनी मोठे यश मिळवले.१९८७ मध्ये मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘भद्रकाली’ नाट्यसंस्थेने प्र.ल.मयेकर यांचे ‘पांडगो इलो रे बा इलो’ हे नाटक रंगभूमीवर आणले आणि हे नाटक रसिकांनी डोक्यावर घेतले. या नाटकाच्या निमित्ताने प्र.ल.मयेकर व मच्छिंद्र कांबळी अशी हिट जोडी जमली आणि या नाटकाने महोत्सवी प्रयोग होण्यापर्यंत मजल मारली. अरुण नलावडे, दिलीप कोल्हटकर, विनय आपटे, कुमार सोहोनी, मंगेश कदम अशा दिग्दर्शकांनी प्र.ल.मयेकर यांची नाटके दिग्दर्शित केली आणि या नाटकांतून रंगभूमीला अनेक कलावंत मिळवून दिले. भक्ती बर्वे-इनामदार, अरुण नलावडे, सतीश पुळेकर, स्वाती चिटणीस, सुहास जोशी, गिरीश ओक आदी नामवंत कलाकारांनी मयेकर यांच्या नाटकांतून भूमिका रंगवल्या.
मयेकर म्हणजे ग्रेट व्यक्तिमत्त्व
By admin | Published: August 19, 2015 1:27 AM