असमान निधी वाटपाप्रकरणी महापौर गोत्यात

By admin | Published: March 28, 2015 01:28 AM2015-03-28T01:28:06+5:302015-03-28T01:28:06+5:30

असमान निधी वाटपावरुन काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्यानंतर आता मनसेनेही शिवसेनेला कोंडीत पकडले आहे़

Mayor Dostat on the uneven fund allocation | असमान निधी वाटपाप्रकरणी महापौर गोत्यात

असमान निधी वाटपाप्रकरणी महापौर गोत्यात

Next

मुंबई : असमान निधी वाटपावरुन काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्यानंतर आता मनसेनेही शिवसेनेला कोंडीत पकडले आहे़ ठेकेदारांशी संगनमत करीत महापौर स्नेहल आंबेकर यांनी शंभर कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केला आहे़ मुंबईच्या प्रथम नागरिकाविरोधात अशा प्रकारे तक्रार दाखल होण्याचीही पहिलीच वेळ आहे़
सन २०१५-२०१६ च्या अर्थसंकल्पातील वाढीव चारशे कोटींच्या निधीत मोठा वाटा शिवसेनेने लाटल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे़ मात्र पालिकेच्या महासभेत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्यापूर्वी महापौरांनी ठेकेदारांशी संगनमत करुन त्यात शंभर कोटी रुपयांच्या कामांची फेरफार केल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेतून केला़ नगरसेवकांकडून टक्केवारी घेऊन या निधीचे प्रभागस्तरावरील कामांसाठी वाटप झाल्याचा आरोपही त्यांनी केला़
बोरिवली येथील मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांच्या प्रभाग क्ऱ १३ मध्ये एका उद्यानाला दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी आवश्यकता नसतानाही शिवसेनेच्या नगरसेविका अनघा म्हात्रे यांच्या पत्रावर मंजूर करण्यात आल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला़ कथित घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी वरळीतील मनसे नगरसेवक संतोष धुरी आणि देशपांडे यांनी एसीबीकडे आज तक्रार दाखल केली़ नेहमीप्रमाणे याप्रकरणीदेखील आपली प्रतिक्रिया देण्यास महापौर प्रसारमाध्यमांना उपलब्ध झाल्या नाहीत़ (प्रतिनिधी)

महापौरांच्या अडचणीत वाढ
काँग्रेसने यापूर्वीच महापौरांच्या वाट्याला आलेल्या शंभर कोटींच्या निधीची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती़ त्यात निधी वाटपात वाटा न मिळालेल्या स्वपक्षीय नगरसेवकांकडूनही नाराजीचा सूर उमटत असताना आता मनसेनेही तक्रार केली आहे़ त्यामुळे महापौर स्नेहल आंबेकर चांगल्याच गोत्यात आल्या आहेत़

पुरावा देण्याची मनसे तयारी
मनसेने केलेल्या आरोपांचे महापौरांनी खंडन केल्यास आवश्यक असलेले पुरावे एसीबीकडे सादर करण्याची तयारी असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे़

Web Title: Mayor Dostat on the uneven fund allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.