मुंबई : पश्चिम रेल्वेच्या ग्रांट रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीचे नागरिकांच्या मदतीने प्राण वाचविणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे यांचा मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी भायखळा येथील महापौर निवासस्थानी बुधवारी सत्कार करून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, एक महिला म्हणून लताताईने दाखविलेल्या धाडसाचा अभिमान असून, तुझ्या कार्यतत्परतेमुळे त्या व्यक्तीचे आज प्राण वाचू शकले. लताताईने दाखविलेले साहस व कार्यतत्परता कौतुकास्पद असून, यापुढेही अशा प्रसंगाला तू धैर्याने सामोरे जावे. तर लता बनसोडे म्हणाल्या की, त्या व्यक्तीचे प्राण वाचविणे ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती; परंतु जीव धोक्यात घालून आपल्याला त्या व्यक्तीचे प्राण वाचविणे आवश्यक आहे, हे डोळ्यासमोर होते. रेल्वे रुळावर त्या व्यक्तीला मला एकट्याने उचलणे शक्य नसल्यामुळे सर्वप्रथम मी धावत जाऊन येणारी ट्रेन थांबविली व त्यानंतर प्रवाशांच्या मदतीने त्या व्यक्तीला उचलून रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार दिल्याचे सांगितले. त्यानंतर थोड्यावेळाने टॅक्सीमध्ये बसवून त्या व्यक्तीला त्याच्या घराकडे रवाना केले.