Join us

वरळीतील तीन धोकादायक इमारतींची महापौरांकडून पाहणी, भाडेकरू, विकासकाची घेतली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 3:08 AM

मुंबईत म्हाडाच्या समारे १६ हजार उपकरप्राप्त धोकादायक इमारती आहेत. तसेच महापालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात खासगी व महापालिकेच्या जमिनीवरील ४००हून अधिक इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले.

मुंबई : गेल्या महिन्याभराच्या कालावधीत मुंबईत फोर्ट, चेंबूर, नागपाडा आणि डोंगरी परिसरात इमारत व इमारतींचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये निष्पाप रहिवाशांचा बळी गेला. यामुळे मुंबईतील उपकरप्राप्त व धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची गंभीर दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी धोकादायक इमारतींची पाहणी सुरू केली आहे. त्यानुसार वरळी नाका येथील इमारतीच्या भाडेकरु आणि विकासकांची संयुक्त बैठक बुधवारी घेतली.मुंबईत म्हाडाच्या समारे १६ हजार उपकरप्राप्त धोकादायक इमारती आहेत. तसेच महापालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात खासगी व महापालिकेच्या जमिनीवरील ४००हून अधिक इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. या इमारतींचा प्रश्न प्रत्येक पावसाळ्यात ऐरणीवर येतो. मात्र काही ठिकाणी भाडेकरू आणि विकासकामांमध्ये एकमत होत नाही, तर कुठे रहिवासी इमारत रिकामी करण्यास तयार नसतात. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडून जीवितहानी होते.यावर्षी आतापर्यंत फोर्ट येथील भानुशाली इमारत, नागपाडा येथील मिश्रा इमारत आणि बुधवारी डोंगरी येथे इमारतीचा भाग कोसळून जीवितहानी झाली. धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी महापौर पेडणेकर यांनी सोमवारी सर्व संबंधित पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.त्यानंतर बुधवारी वरळी नाका येथील ३९१ रावते या उपकरप्राप्त तीन इमारतींची पाहणी म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर आणि महापौर यांनी केली. यावेळी संबंधित इमारतीतील भाडेकरू आणि विकासकामधील तिढा सोडविण्याचा प्रयत्न महापौरांनी केला.विकासकाला म्हाडाची नोटीस....म्हाडाकडून विकासकाला सात दिवसांच्या कालावधीत इमारतीच्या दुरुस्तीची नोटीस बजाविण्यात येईल. विकासक तयार नसल्यास भाडेकरूंना म्हाडाकडून इमारत दुरुस्तीबाबत नोटीस बजाविण्यात येणार आहे. त्यासोबतच भाडेकरूंच्या हिताबाबत राज्य शासन लवकरच धोरण जाहीर करणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. तर विकासकाने इमारत दुरुस्त न केल्यास भाडेकरूंनी म्हाडाकडे दुरुस्तीचे पैसे भरणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हाडाकडून इमारत दुरुस्तीचे काम करण्यात येईल, असे झाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :मुंबई