Join us

चार नवजात शिशूंच्या मृत्यूप्रकरणाचा अहवाल लवकर सादर करा: महापौर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 10:09 AM

चौकशी समितीला निर्देश; सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहाला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात चार नवजात शिशूंच्या मृत्यूप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसूतिगृहाला शुक्रवारी भेट देऊन  बालकांच्या मृत्यूची नेमकी काय कारणे आहेत, हे जाणून घेतले. तसेच सायन रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देशही दिले.

सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात ऑगस्ट २०२१ पासून २६८ नवजात शिशू अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २३४  नवजात शिशू वाचविण्यात येथील डॉक्टरांना यश आले.  तसेच संस्थेमार्फत एका सत्रात दोन अहर्ताप्राप्त डॉक्टर कार्यरत आहेत.

माया आईची!

प्रसूतिगृहाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी येथे एका बाळाची आणि त्याच्या आईची मायेने विचारपूस केली. या बाळाचे वजन जन्माच्या वेळी १.९०० ग्रॅम होते. ते आज अडीच किलो झाले असून त्याची प्रकृती ठणठणीत आहे.

मृत्यू जंतुसंसर्गामुळे

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार नवजात शिशूंचा मृत्यू जंतुसंसर्गामुळे झाला. चार बालकांपैकी एक मुलगी व तीन मुले होते. त्यापैकी दोन कमी वजनाची व प्रीमॅच्युअर होती. एक नवजात शिशू गंभीर स्वरूपात दाखल झाले. तसेच एका शिशूला फीट येऊन गुंतागुंत निर्माण झाली होती.  

मृत्यूप्रकरणी फौजदारी चौकशी करा - शेलार

भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात २० ते २३ डिसेंबर या कालावधीत चार नवजात शिशूंच्या मृत्यू प्रकरणाची  वैद्यकीय चौकशी ही नि:पक्ष झाली पाहिजे. हा एक घोटाळा असून याबाबत अनेक बाबींंची लपवाछपवी केली जात असल्याने त्याची पोलिसांकडून चौकशी करा, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली. 

उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयाला भेट दिली नाही. वांद्रे-वरळी सेतूवर ते लाईटिंग करण्यात मग्न आहेत, असा टोला शेलार यांनी लगावला. शेलार व भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केली. हे रुग्णालय पालिकेचे, त्याची चौकशी करणारे पालिकेच्या सायन रुग्णालयातील डॉक्टर त्यामुळे पालिकेच्या यंत्रणेची नि:पक्षपाती चौकशी कशी होणार? म्हणून ही त्रयस्थांकडून ही चौकशी झाली पाहिजे, असे शेलार म्हणाले.

या रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग हा महापालिका चालवत नसून त्याचे कंत्राट दिले आहे. यासाठी या संस्थेला मुंबई महापालिकेने ३ वर्षांसाठी ८,२१,२५,००० रुपये दिले आहेत. हा एक घोटाळा आहे. कारण या संस्थेला जेव्हा स्थायी समितीने कंत्राट दिले त्यावेळी एकच कंपनी आली आणि तिला काम दिले, असे शेलार म्हणाले.

राजूल पटेल यांनी व्यक्त केली दिलगिरी 

सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजूल पटेल यांनी या प्रकरणात केलेल्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका होत होती. त्यानंतर या प्रकरणानंतर मी खूप भावुक झाली. घटनास्थळी मी संस्थेला जाब विचारला. यावेळी नातेवाइकांशी बोलताना भावुक झाली. माझ्या बोलण्याने नातेवाईक दुखावले गेल्याने मी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :किशोरी पेडणेकर