कुर्ला, सीएसटी रोड येथील किस्मतनगरच्या पाईप गल्लीमध्ये असलेल्या भंगारच्या दुकानांना आज दिनांक ०७ एप्रिल २०२१ रोजी आग लागल्याचे समजताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी लागलेल्या आगीबाबत चर्चा केली. याप्रसंगी नगरसेविका सईदा खान, नगरसेवक कप्तान मलिक, "एल" विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील ही जागा असून यापूर्वी या ठिकाणी लागलेला आगीच्या घटना लक्षात घेता, या ठिकाणी मिनी फायर स्टेशन बांधण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका सईदा खान यांनी यापूर्वी केली आहे.अरुंद गल्ल्यांमध्ये आग विझविण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या ठिकाणी तात्काळ मिनिफायर स्टेशन करण्याबाबत लवकरच संबंधितांची बैठक घेणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. यापूर्वी मुंबईमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सर्व ठिकाणचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश अग्निशमन दलासोबत घेतलेल्या बैठकीत दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. या आगीचा संपूर्ण अहवाल आल्यानंतरच यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.