आसनव्यवस्थेवरून महापौर-मनसेत बाचाबाची
By admin | Published: June 15, 2014 12:00 AM2014-06-15T00:00:45+5:302014-06-15T00:00:45+5:30
शुक्रवारी पार पडलेली केडीएमसीची महासभा दिवंगत केंद्रिय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहून तहकूब केली जाणार होती
कल्याण : शुक्रवारी पार पडलेली केडीएमसीची महासभा दिवंगत केंद्रिय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहून तहकूब केली जाणार होती. परंतु आसनव्यवस्थेवरून महापौर कल्याणी पाटील आणि मनसेच्या सदस्यांमध्ये तू तू मै मै झाल्याने श्रध्दांजलीचा कार्यक्रम भाषणे न होताच आटोपता घेण्याची नामुष्की ओढावली. सभा तहकुबीनंतर मनसेकडून सभागृहात पुन्हा एकदा मुंडे यांना स्वतंत्रपणे श्रद्धांजली वाहिली गेल्याने लोकनेत्याच्या श्रद्धांजलीची झालेली थट्टा ही शरमेची बाब ठरली आहे.
मुंडे यांचे ३ जूनला दिल्ली येथे अपघाती निधन झाले. शुक्रवारी झालेल्या महासभेत त्यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सभेच्या सुरूवातीला पिठासीन अधिकारी असलेल्या महापौर पाटील यांनी आयत्या वेळचे विषय पटलावर दाखल करून घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निलेश शिंदे यांचे नाव जाहीर केले. विरोधी पक्षनेतेपदी आघाडीचे विश्वनाथ राणे यांची नेमणूक झाल्याने पुढील महासभेपासून आसनव्यवस्थेत बदल होतील, अशी घोषणा पाटील यांनी जाहीर करताच याला मनसेच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. अखेर गोंधळातच मुंडेंना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली. ही सभ १८ जूनला होणार आहे. गोंधळाची घटना क्लेशदायक असल्याची भावना उपमहापौर दामले यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)