मुंबई : दादर, शिवाजी पार्क येथील महापालिका कर्मचाऱ्यांच्या जिमखान्याच्या जागेतच महापौर निवासस्थान बांधण्यावर प्रशासन ठाम आहे. याबाबतची तरतूद अर्थसंकल्पात करीत बंगल्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. याविरोधात मनसेने दंड थोपटले आहेत़ जिमखान्यावर बंगला होऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. महापौर बंगल्यावरून पुन्हा नवीन वाद रंगणार आहे.शिवाजी पार्कसमोरील ऐतिहासिक महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आला आहे. मुंबई महापौरांच्या प्रतिष्ठेला साजेसा बंगला शोधण्याचे काम गेली दोन वर्षे सुरु होते. विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मलबार हिल येथील शासनातील सनदी अधिकारी राहत असलेल्या बंगल्यावर दावा केला़ त्यानेही वाद निर्माण झाला होता. अखेर महाडेश्वर यांनी आपला हट्ट सोडून राणीच्या बागेतील बंगल्यात स्थलांतर केले.हे तात्पूरते निवासस्थान असून लवकरच शिवाजी पार्कवरील जिमखान्याच्या जागेवर नवीन बंगला उभा राहणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करून या प्रकल्पाकरिता खाते उघडण्यात आले आहे. या बंगल्यासाठी डिझाईनही तयार करण्यात आले आहे, लवकरच मंजुरी घेऊन बंगल्याच्या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल.मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पालिका जिमखान्याच्या जागेत नवीन महापौर बंगला उभारण्यास विरोध केला आहे. त्यामुळे बंगल्याचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
महापौरांच्या नवीन प्रस्तावित बंगल्याचा वाद रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:08 AM