Join us

‘महापौर’: भाजपापेक्षा शिवसेनेची डोकेदुखी!

By admin | Published: November 03, 2015 1:19 AM

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आपला महापौर विराजमान करायचा असेल तर शिवसेनेला डोकेदुखीचा सामना करावा लागणार आहे. भाजपाची पाटी कोरी असल्याने त्यांना फारशी

- अनिकेत घमंडी,  डोंबिवली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आपला महापौर विराजमान करायचा असेल तर शिवसेनेला डोकेदुखीचा सामना करावा लागणार आहे. भाजपाची पाटी कोरी असल्याने त्यांना फारशी चिंता करावी लागणार नाही. शिवसेनेने आतापर्यंत अनेकांना महापौरपदाचे गाजर दाखवले असल्याने एकाला महापौर दिले तर दुसरा नाराज होऊन त्याचा फटका त्या पक्षाला बसू शकतो. महापौर निवडीकरिता बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मनसेसह अन्य छोट्या पक्षांचा पाठिंबा घेणे शिवसेना व भाजपाला गरजेचे असल्याने लागलीच कुणाला उपमहापौरपद, कुणाला स्थायी समिती, कुणाकडे परिवहन समिती तर कुणाची वृक्ष प्राधिकरणावर बोळावण करायची ? याची चर्चा सुरु झाली आहे.वेगवेगळ््या पदांकरिता शिवसेना व भाजपाकडून आमिषे दाखवली जाण्याची शक्यता असल्याने त्याबाबतची कमिटमेंट झाल्यानंतर महापौर पदावर कोण बसणार याचा निर्णय घेताना शिवसेना पक्षश्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. या पक्षातील मातब्बरांना पक्ष न सोडण्यासाठी वेळोवेळी ‘गाजरं’ दाखवण्यात आल्याने महापौरपदावर अनेकांचा दावा आहे. भाजपमध्ये यासंदर्भात फारशी चिंता नसली तरीही त्या पदासाठी कोण उमेदवार असेल याचाही शोध सुरु आहे. शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पद डोंबिवलीकरांना मिळावे यासाठी मोठी फिल्डींग लावण्यात आली आहे. त्यात डोंबिवलीतून ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, तीन टर्म निवडून आलेले दिपेश म्हात्रे, तसेच पूर्वेकडे सर्वत्र इंजिन-कमळ असतांना भगवा फडकवणारे राजेश मोरे आदींची नावे पुढे येत आहेत. याच पद्धतीने कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिकांनीही दावा केला असल्याने पक्षश्रेष्ठींची कोंडी वाढणार आहे. कल्याणमधील सैनिकांच्या दाव्यानुसार यावेळेस युती नसल्याने खऱ्या अर्थाने शिवसेनेला कल्याणने तारले आहे. त्यामुळे कल्याणकरांना त्यातही पश्चिमेकडील ज्येष्ठांना ते पद मिळावे यासाठीही चुरस निर्माण झाली आहे.भाजप कडेही महापौर पदासाठी पक्षातच काही नावे आहेत. पण त्या सोबतच सत्तेत येण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव ज्या पद्धतीने करण्यात येत आहे, त्यात आधी सत्ता मिळवू त्यानंतर या पदासाठी विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेत मात्र महापौर पदासाठी प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे इच्छुुकांपैकी ज्यांना हे पद मिळेल त्यांच्या व्यतिरीक्त ज्यांना हे पद मिळणार नाही, ते नाराज झाल्यास ते अन्य पर्यायांचा विचार करतील, अशी भीती आहे. विधानसभा निवडणुका आगोदरही अशाच कमिटमेंट पाळल्या न गेल्याने काही मातब्बर मंडळी शिवसेना सोडण्याच्या पावित्र्यात होते का? त्यांचे काय होणार अशा चर्चांना उधाण आले आहे. जे नाराज होतील ते भाजपला आतून मदत करणार का? भाजपा त्यांना हे पद देणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीणमधून पक्षाने तिकिट नाकारताच रातोरात भाजपने त्यांना आमदारकीचे तिकीट दिले होते. परंतु केवळ संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शब्दाखातर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या आमदार सुभाष भोईर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्यावेळी त्यांना महापौर पदाची कमिटमेंट देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी पक्ष आदेश मानला होता,असे त्यावेळीच सांगण्यात आले होते. शिवसेना पक्षामध्ये कमिटमेंटला जागा नसून कर्तृत्वाला जागा आहे. मी तीन वेळा निवडून आलो असल्याने कर्तृत्व सिद्ध केले आहे. माझ्या गाठीशी वडीलांच्या महापौरपदासह माझ्या कामाचा अनुभव आहे.मी युवा आहे, अनेकांना संधी दिलेली आहे.त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निश्चितच माझा विचार करतील - दीपेश म्हात्रे, नगरसेवक