मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणी जागवल्या. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅजेस्टिक समोरील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी सायंकाळी रोजी सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्यानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहण्याकरिता आज सकाळी 10.30 वाजता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
कृष्णकुंजवरील सुमारे 15 मिनीटांच्या भेटीत त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते. त्यापूर्वी महापौरांनी सकाळी 9.45 वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मलबारहिल येथील सागर बंगल्यावर जाऊन त्यांना सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. या कार्यक्रमाचं निमंत्रण सर्वपक्षीय नेत्यांना दिलं जात आहे. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे अशा मोठ्या नेत्यांना स्वतः महापौर निमंत्रण देत आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी हे दोन्ही भाऊ एकत्र आले होते. त्यानंतर, तब्बल एका वर्षाने तेही बाळासाहेबांच्या निमित्तानेच उद्धव-राज एकत्र येत आहेत. त्यामुळे, या कार्यक्रमाची उत्सुकता शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना लागली आहे.