सार्वजनिक कार्यक्रमाला महापौर जाणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:15 AM2021-02-20T04:15:28+5:302021-02-20T04:15:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लग्न समारंभ, वाढदिवस सोहळे अशा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका वाढत ...

The mayor will not attend the public event | सार्वजनिक कार्यक्रमाला महापौर जाणार नाहीत

सार्वजनिक कार्यक्रमाला महापौर जाणार नाहीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लग्न समारंभ, वाढदिवस सोहळे अशा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे लग्‍न समारंभ, उपहारगृहे, चित्रपटगृह, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी ५०पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास दंड व त्या-त्‍या आस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार यापुढे लग्न समारंभ, वाढदिवस, बारसे अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आहे.

कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे कोविड काळात रखडलेले लग्न सोहळे व अन्य कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडले. अशा कार्यक्रमांमध्ये एकाचवेळी बहुसंख्येने लोक एकत्रित आल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा कार्यक्रमांवर निर्बंध आणणे आवश्यक बनले होते. विभागस्तरावर अशा सोहळा व कार्यक्रमावर महापालिकेने नेमलेल्या मार्शलचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, मुंबईच्या प्रथम नागरिक असल्याने महापौरांना अनेक कार्यक्रमांचे आमंत्रण दररोज येत असते. महापौरांच्या उपस्थितीमुळे अनेकवेळा अशा ठिकाणी लोकांची गर्दी होत असते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार अशा कार्यक्रमांमधून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका टाळण्यासाठी किमान पुढील १५ दिवस अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नसल्याचे महापौरांनी सांगितले.

पंचतारांकित हॉटेलची महापौरांकडून पाहणी

सांताक्रूझ येथील हॉटेलमधून चार आंतरराष्ट्रीय प्रवासी पळून गेल्याचे उजेडात आले होते. त्यामुळे अंधेरी येथील पंचतारांकित हॉटेलची महापौरांनी शुक्रवारी आकस्मिक पाहणी केली. या हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक स्वतंत्र मजलाच आरक्षित करण्यात आल्याचे दिसून आले. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवाशांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी कोविड चाचणी करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

Web Title: The mayor will not attend the public event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.