वांद्र्यातून लढण्यास महापौर इच्छुक; तृप्ती सावंत यांची उमेदवारी धोक्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 02:38 AM2019-08-03T02:38:23+5:302019-08-03T02:38:26+5:30

काँग्रेसमधील इच्छुकांची यादीही वाढली : मनसेचे तळ्यात-मळ्यात असल्याचा सेनेला फायदा

Mayor willing to fight monkey; Tatupati Sawant's candidacy in jeopardy? | वांद्र्यातून लढण्यास महापौर इच्छुक; तृप्ती सावंत यांची उमेदवारी धोक्यात?

वांद्र्यातून लढण्यास महापौर इच्छुक; तृप्ती सावंत यांची उमेदवारी धोक्यात?

Next

खलील गिरकर

मुंबई : ‘मातोश्री’चे वजन टिकवण्यासाठी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ राखण्याचे आव्हान नेहमीच शिवसेनेसमोर असते. बाळा सावंत यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणे यांनी शिवसेनेसमोर आव्हान निर्माण केले होते. मात्र, शिवसैनिकांनी हा गड अभेद्य राखला. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या. मात्र, तृप्ती सावंत यांचा जनसंपर्क पाहता शिवसेना या निवडणुकीत येथील उमेदवार बदलण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी वांद्रे पूर्वमधून विधानसभा लढविण्याची इच्छा पक्ष प्रमुखांजवळ व्यक्त केली आहे. मतदारसंघातील त्यांचा राबता पाहता महाडेश्वर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून लढण्यासाठी राज्य हज समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष हाजी इब्राहिम शेख व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचे पुत्र जीशान सिद्दिकी इच्छुक आहेत. काँग्रेसमधील इच्छुकांच्या मुलाखती या आठवड्यात होणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील गिरीही येथून लढण्यास इच्छुक आहेत. मनसेकडून या मतदारसंघात फारशी हालचाल झालेली दिसून येत नाही. या मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दिवंगत बाळा सावंत यांच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेनेचे उमेदवार असतानाही त्यांना सातत्याने या ठिकाणी विजय मिळत होता. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना व भाजपची एकत्रित मते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण मतांपेक्षा पुष्कळ जास्त होती; त्यामुळे युती झाली तर या मतदारसंघावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकण्याचीच चिन्हे आहेत.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या प्रभागातून ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. माझी पत्नीही नगरसेविका म्हणून निवडून आली होती. गेली ३६ वर्षे या भागात सामाजिक व राजकीय काम केले आहे. शिवसेनेचा गटप्रमुख पदापासून काम सुरू करून महापौर झालो. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील व तो माझ्यावर बंधनकारक असेल.
- विश्वनाथ महाडेश्वर,
महापौर, मुंबई
शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी अनेक जण लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यात काहीही वावगे नाही. मात्र उमेदवार कोण असेल याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील व तो अंतिम असेल.
- आमदार अनिल परब,
विभाग प्रमुख, शिवसेना
या मतदारसंघात माझे पती दिवंगत बाळा सावंत यांनी मोठे काम केले आहे. त्यांचे काम पुढे नेण्याचा मी प्रयत्न केला आहे. राजकारणात लढण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. मात्र याबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार केवळ पक्षप्रमुखांनाच आहे.
- तृप्ती सावंत, विद्यमान आमदार

पोटनिवडणुकीतील मतांची आकडेवारी
२०१५च्या पोटनिवडणुकीमध्ये तृप्ती सावंत यांना ५२ हजार ७११ मते मिळाली व १९ हजार ८ मताधिक्याने त्यांना विजय मिळाला. काँग्रेसच्या नारायण राणे यांना ३३ हजार ७०३ मते मिळाली होती; तर एमआयएमच्या राजा रहबर खान यांना १५ हजार ५० मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार रिंगणात नव्हता.

महापौर केवळ
३४ मतांनी विजयी
उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत महाडेश्वर यांनी भाजपच्या महेश पारकर यांचा ३४ मतांनी पराभव केला होता. शिवसेनेकडून आता महाडेश्वर व भाजपकडून पारकर इच्छुक आहेत. जर युती झाली नाही, तर हा सामना पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.

बाळा सावंत यांचे एकहाती वर्चस्व
२०१४च्या निवडणुकीत बाळा सावंत यांना ४१ हजार ३८८ मते मिळाली होती व ते १५ हजार ५९७ च्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्या वेळी भाजपच्या कृष्णा पारकर यांना २५ हजार ७७८ मते, एमआयएमच्या रहबर खान यांना २३ हजार ९७४ मते, काँंग्रेसच्या संजीव बागडी यांना १२ हजार २२८ मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष धुवाळी यांना ९ हजार ७२३ मते, तर मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांना ५ हजार ३९९ मते मिळाली होती.

Web Title: Mayor willing to fight monkey; Tatupati Sawant's candidacy in jeopardy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.