मुंबई : रांगडा खेळ अशी ओळख असलेल्या कुस्तीचा थरार २६ डिसेंबरपासून मुंबईत रंगणार आहे. मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालिम संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने २९ व्या मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ व २७ डिसेंबर असे दोन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील अव्वल मल्ल एकमेकांपुढे आव्हान उभे करतील. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे ही स्पर्धा होणार असून ५७ ते ६२ किलो, ६२ ते ६८ किलो, ६८ ते ७४ अशा वजनी गटात रंगतदार लढती होतील. शिवाय ५० ते ६० किलो वजनी गटात महिला कुस्तीही रंगतील.७४ किलो पेक्षा अधिक आणि मुंबई महापौर कुमार गट ५० ते ६० किलो गटासाठी राज्यभरातील कुस्तीपटू मुंबईत आपला जोर आजमावतील. २६ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता स्पर्धेच्या थरारास सुरुवात होईल. त्याचबरोबर, शालेय मुलांच्या चार आणि मुलींचे दोन गट पाडण्यात आले आहे. ३२ किलो, ३२ ते ३५ किलो, ३५ ते ४२ किलो, ४२ ते ५० किलो अशा वजनी गटात मुलांच्या लढती होतील. तर, ४० ते ४५ किलो आणि ४५ ते ५० किलो वजनी गटात मुलींचे सामने पार पडतील. शिवाय बहुप्रतिक्षित राज्य महिला कुस्ती जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रंगणार असल्याची माहिती तालिम संघाचे कार्याध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.
मुंबईत रंगणार महापौर कुस्तीचा थरार
By admin | Published: December 24, 2016 3:51 AM