महापौरांचा राणीबागेतील बंगल्यात ‘गृहप्रवेश’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 05:01 AM2019-01-22T05:01:54+5:302019-01-22T05:02:05+5:30
गेल्या सात दशकांपासून मुंबईच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या दादर येथील बंगल्याचे रूपांतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात होणार आहे.
मुंबई : गेल्या सात दशकांपासून मुंबईच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या दादर येथील बंगल्याचे रूपांतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात होणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी हा बंगला सोडला आणि भायखळा येथील बंगल्यात ‘गृहप्रवेश’ केला. त्यामुळे महापौरांच्या प्रतिष्ठेला साजेसा बंगला तयार होईपर्यंत हेच महापौरांचे शासकीय निवासस्थान असणार आहे.
दादरच्या शिवाजी पार्क येथील पुरातन वास्तू असलेल्या महापौर बंगल्याची जागा शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यानंतर महाडेश्वर यांनी राणीबागेतील बंगल्यात स्थलांतरित होण्यास नकार दिला होता. मलबार हिल येथील जल अभियंता खात्याच्या प्रशस्त बंगला देण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र त्या बंगल्यात सनदी अधिकारी प्रवीण आणि पल्लवी दराडे राहत असल्याने वाद निर्माण झाला होता. गेले दीड वर्ष हा वाद सुरू असल्याने स्मारकाचे कामही मंदावले होते. अखेर महापौर राणीबागेतील बंगल्यात स्थलांतरित होण्यास तयार झाले.
त्यानुसार गेले काही दिवस महापौर बंगल्यात सामानाची बांधाबांध सुरू होती. सोमवारी सकाळी महापौर महाडेश्वर यांनी कुटुंबासह राणीच्या बागेतील बंगल्यात गृहप्रवेश केला. मुंबईच्या महापौरांसाठी नवे निवासस्थान शिवाजी पार्क येथील पालिका कर्मचाऱ्यांच्या जिमखान्याच्या जागेवर बांधण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. मात्र, मनसेने या जागेवर महापौर बंगला बांधू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे तूर्तास राणीबागेत उद्यान अधीक्षकांचा बंगला हेच महापौरांचे शासकीय निवासस्थान असेल.