मुंबई : दादर पश्चिम, शिवाजी पार्क येथील पुरातन वास्तू असलेल्या महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकाचे भूमिपूजन पुढच्या आठवड्यात असल्याने विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सामानाची बांधाबांध सुरू केली आहे. लवकरच ते महापौर बंगला खाली करून राणीबागेतील बंगल्यात वास्तव्यास जाणार आहेत.
महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर महापौरांच्या निवासस्थानाचा प्रश्न उभा राहिला होता. महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसा बंगला असावा, असा सत्ताधाऱ्यांचा व विद्यमान महापौरांचा अट्टाहास होता. यासाठी मलबार हिल येथील सनदी अधिकारी प्रवीण व पल्लवी दराडे यांचे वास्तव्य असलेल्या बंगल्यावर त्यांनी दावा केला होता. राज्य शासनानेही पालिकेला दाद न दिल्याने अखेर महापौरांनी राणीबागेतील बंगल्यात जाण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, बाळासाहेबांच्या जयंती दिनी म्हणजेच २३ जानेवारीला स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. पर्यायी निवासस्थान म्हणून राणीबागेतील बंगला महापौरांसाठी आरक्षित केला आहे. या बंगल्यात महापौर आणि कुटुंबीयांनी काही सुधारणा सुचवल्या. त्या करून बंगला १५ दिवसांत तयार ठेवा, असे आदेश त्यांनी पालिका अधिकाºयांना दिले होते. त्यानुसार राणीबागेतील बंगल्याची रंगरंगोटी आणि सुधारणा करून बंगला तयार ठेवण्यात आला आहे.आठवडाभरात राहायला जाणारमहापौर महाडेश्वर यांनी शिवाजी पार्क येथील बंगल्यातील आवराआवर सुरू केली आहे. शिवाजी पार्क येथील बंगल्यातील सामान राणीबागेतील बंगल्यात हलविण्याचे काम गुरुवारपासूनच सुरू झाले आहे. येत्या आठवडाभरात महापौर आपल्या कुटुंबासह राणीबागेतील नव्या बंगल्यात राहण्यास जाणार आहेत.