पालिका शाळेतील क्रीडापटूंना महापौर शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 06:36 AM2018-08-28T06:36:25+5:302018-08-28T06:36:50+5:30
शिक्षण समितीची मंजुरी : १६.४० लाख रुपयांची तरतूद, ईसीएसमधून रक्क म देणार
मुंबई : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या, तसेच विजयी होणाºया शालेय क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महापौर विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्ती’ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या शाळेतील क्रीडापटूंना याअंतर्गत तीन ते आठ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
पालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक, नगरबाह्य शाळा आणि मतिमंद शाळांमधील विद्यार्थी वैयक्तिक आणि सांघिक खेळात चमकदार कामगिरी बजावत आहेत. तसेच मान्यताप्राप्त असोसिएशनशी संलग्न क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मिळवत आहेत. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या आदेशानुसार पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांसाठी महापौर विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्तीकरिता नियमावली तयार केली आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना ईसीएसच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाºयांनी सोमवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत सांगितले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी, विजयी विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये, राज्यस्तरीय स्पर्धेतील विद्यार्थ्यांना तीन ते आठ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे पालिका शाळांमधील क्रीडापटू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास पालिका अधिकाºयांनी व्यक्त केला.
तीन ते आठ हजार रुपये देणार
च्राज्य सरकारमार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विजयी क्रीडापटूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रथम पारितोषिक विजेत्यास ३० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक विजेत्यास २२ हजार ५०० रुपये, तर तृतीय पारितोषिक विजेत्यास १५ हजार रुपये, तर स्पर्धेत सहभागी होणाºया क्रीडापटूंना प्रत्येकी ११ हजार २५० रुपये देण्यात येतात. पालिकेतर्फे महापौर शिष्यवृत्तीपोटी क्रीडापटूंना तीन ते आठ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी १६.४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.