मुंबई : महापालिका ही आशिया खंडातील ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांकरिता विविध कल्याणकारी धोरण ठरविणारी व राबविणारी पहिली महापालिका असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापौर स्नेहल आंबेकर यांनी सन २०१५-१६ या अर्थसंकल्पीय वर्षात महापौरांच्या अधिकारातील विकास निधीतून ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयातील महापौर दालन येथे सोमवारी संयुक्त बैठक झाली. यावेळी महापौर म्हणाल्या की, मुंबई शहरात सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिक राहत असून त्यांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक धोरण राबविण्यात येत आहे. सन २०१५-१६ या अर्थसंकल्पीय वर्षात महापौरांनी विकास निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० लाखांची तरतूद केलेली आहे. शहरात व उपनगरात विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र निर्माण झाली असून या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची साधने तसेच अन्य बाबीही उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही तरतूद केलेली आहे. (प्रतिनिधी)
महापौरांची ज्येष्ठ नागरिकांना मदत!
By admin | Published: April 07, 2015 5:18 AM