मयुरेश राऊत यांचा एनआयएने नोंदविला जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:07 AM2021-05-08T04:07:36+5:302021-05-08T04:07:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप करणारे विरारमधील व्यावसायिक मयुरेश राऊत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप करणारे विरारमधील व्यावसायिक मयुरेश राऊत यांना शुक्रवारी एनआयएने कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडे सहा तास चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविण्यात आला.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आपल्या चोरी झालेल्या मर्सिडीज गाडीचा वापर झाल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केला होता. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच पोलीस महासंचालक संजय पांडे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. याच प्रकरणी शुक्रवारी एनआयएने त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला, तसेच त्यांच्याकडील काही पत्रव्यवहार, तक्रारीच्या प्रतीही ताब्यात घेतल्या.
राऊत यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत, आपण कोर्टात गेलो नसतो, तर माझीही अवस्था मनसुख हिरेनसारखीच झाली असती, अशी भीतीही माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.