Join us

माझगाव, बीकेसीने गाठले प्रदूषणाचे टोक, प्रदूषणाबाबत मुंबई करतेय दिल्लीची बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 3:04 AM

रहिवासी क्षेत्रांचाही श्वास कोंडला : प्रदूषणाबाबत मुंबई करतेय दिल्लीची बरोबरी

मुंबई : दिल्लीच्या प्रदूषणात चढउतार नोंदविण्यात येत असतानाच दुसरीकडे मुंबईदेखील आता प्रदूषणाबाबत दिल्लीची बरोबरी करू लागली आहे. कारण गेल्या आठवडाभरापासून मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढतच असून, मुंबईची हवा सातत्याने ‘वाईट’ या विभागात नोंदविली जात आहे. विशेषत: २२ डिसेंबरपासून ‘वाईट’ नोंदविण्यात येत असलेली मुंबईची हवा शुक्रवारी म्हणजे २७ डिसेंबर रोजी ‘मध्यम’ विभागात नोंदविण्यात आली असून, प्रदूषकांचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईच्या किमान तापमानातही घट नोंदविण्यात आली आहे. मात्र दिल्लीसारखी मुंबईची अवस्था होऊ नये; म्हणून मुंबई महापालिकेसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळीच योग्य पावले उचलली पाहिजेत, असे म्हणणे पर्यावरणतज्ज्ञांनी मांडले आहे.

केवळ दिल्लीच नाही, तर मुंबईसह नवी मुंबईदेखील दिवसागणिक प्रदूषित होत असून, येथे उठत असलेल्या धूळीकणांमुळे नागरिकांचा श्वास कोंडला आहे. धूर, धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार होणारे धूरके; याव्यतिरिक्त वाहत्या वाऱ्याने बदललेली दिशा असे अनेक घटक मुंबईच्या प्रदूषणास कारणीभूत असून, यात दिवसागणिक वाढच होत आहे. बोरीवली, अंधेरी, बीकेसी, चेंबूर, वरळी आणि माझगाव हे परिसर सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत असून, बीकेसी आणि माझगाव येथील हवा सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. विशेषत: या आठवड्यात बीकेसी सातत्याने प्रदूषित क्षेत्र म्हणून नोंदविण्यात आले असून, येथे सुरू असलेली बांधकामे यास कारणीभूत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. चेंबूर येथील कारखान्यांतून हवेत सोडला जाणारा धूर, पश्चिम उपनगरातील कारखाने, सुरू असलेली बांधकामे असे अनेक घटक यास कारणीभूत आहेत.सर्वाधिक प्रदूषण‘सफर’ या संकेतस्थळावर हवेचा दर्जा नोंदविण्यात येतो. डिसेंबर महिन्याचा विचार करता गेल्या २३ दिवसांत बिझनेस हब म्हणून ओळख असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील हवेचा दर्जा अत्यंत खालावल्याचे निदर्शनास आले आहे. बीकेसी सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. बीकेसी येथील हवेचा दर्जा अत्यंत वाईट असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे.वाहते वारे आणि धूलीकणदिल्लीसारखी स्थिती मुंबईत नसून, समुद्राहून वाहते वारे मुंबईच्या हवेतील गुणवत्ता समाधानकारक ठेवण्यास मदत करत आहेत. मात्र जेव्हा केव्हा वारे दिशा बदलतात किंवा स्थिर राहतात, तेव्हा पुन्हा धूळीकण हवेत मिसळतात आणि हवा प्रदूषित होते.बांधकामे, कारखाने, खाणकामे : सातत्याने सुरू असलेली बांधकामे, कारखाने, खाणकामे हे घटक हवेतील धूलिकणांमध्ये भर घालतात. केवळ हेच घटक नाहीत, तर वाहनांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारे प्रदूषणही वातावरण आणखी वाईट करत आहे.१ ते २२ डिसेंबर या कालावधीत मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण २ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले होते.वांद्रे-कुर्ला संकुलाचा विचार करता या काळात बीकेसीमधील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण १७ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले आणि ३ वेळा ३०० पार्टिक्युलेट मॅटरहून अधिक नोंदविण्यात आले.वातावरण फाउंडेशन काय म्हणते?सरकारने धोरणे बदलली पाहिजेत.कार्बन उत्सर्जन कमी केले पाहिजे.सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिले पाहिजे.झाडे लावली पाहिजेत.पर्यावरण जपले पाहिजे.विकास करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

टॅग्स :मुंबई