माझगाव - आंबेवाडी येथे आढळली चुन्याच्या घाण्याची चाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:04+5:302021-07-23T04:06:04+5:30
मुंबई : माझगाव-आंबेवाडी येथे दोन चुन्याच्या घाण्याची चाके आढळून आली असून, याआधी रामशेठ नाईक मार्गावर असे एक चाक आढळून ...
मुंबई : माझगाव-आंबेवाडी येथे दोन चुन्याच्या घाण्याची चाके आढळून आली असून, याआधी रामशेठ नाईक मार्गावर असे एक चाक आढळून आले होते. त्याच्या जतन-संवर्धनसंबंधी पाठपुरावा सुरू आहे.
माझगाव येथील स्थानिक रहिवासी शरद धुमाळ यांना ही दोन चुन्याच्या घाण्याची चाके आढळून आल्यानंतर त्यांनी सदर बाब पुरातन व ऐतिहासिक वस्तू, वास्तू संवर्धक चंदन विचारे यांना कळविली. आधी सापडलेले एक आणि आताच्या दोन चाकांव्यतिरिक्त आणखी दोन चाके सदर विभागातच जवळपास पाहिली गेल्याचे जुन्या स्थानिक लोकांनी सांगितले. पण काळाच्या ओघात ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.
काही दिवसांपूर्वी दादर पूर्व येथे दादासाहेब फाळके मार्गावर असेच एक चुन्याच्या घाण्याचे चाक विचारे यांना आढळून आले. दादर पूर्व येथील १ चाक आणि आता माझगाव येथे आढळून आलेली ३ चाके अशी एकूण ४ चाके मुंबईत आढळून आल्यानंतर मुंबईच्या इतिहासात नव्याने भर पडत असल्याचे तसेच माझगावमध्ये पूर्वी किल्ला असल्याने या चाकांस विशेष महत्त्व असल्याचे विचारे यांनी सांगितले.
पूर्वी गडाच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने चुन्याचा वापर होत होता. हा चुना दळण्यासाठी सदर चाकाचा वापर होत होता. घाण्याच्या साहाय्याने चुना गडावरच बनवला जात होता. यामध्ये गुळ, भाताचे तूस, पाणी पदार्थांचे मिश्रण दगडी चाकाने बैलांमार्फत फिरवले जात होते. असे घाणे व चाके आपल्याला रोहिडा, तिकोणा, विसापूर, गोवळकोट ऊर्फ गोविंदगड, विजयदुर्ग अशा गडांवर पाहायला मिळतात.
फोटो आहे - घाण्याची चाके