माझगावची हवा उपकरणांतील त्रुटीमुळे दिल्लीपेक्षाही खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 12:54 AM2020-03-09T00:54:54+5:302020-03-09T00:55:05+5:30
माझगाव येथील हवाप्रदूषणाने गुरुवारी कहर केल्यानंतर येथील बांधकामांत वाढ झाल्याने आणि रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळे प्रदूषण वाढले असेल, असा तर्क सुरुवातीला लावण्यात आला.
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरातील हवा सातत्याने खराब नोंदविण्यात येत असतानाच, गुरुवारी माझगाव येथील हवा दिल्लीपेक्षाही खराब नोंदविण्यात आली. गुरुवारी सायंकाळी माझगाव येथील हवेच्या गुणवत्तेची नोंद ४५२ पार्टीक्युलेट मॅटर इतकी झाली आणि पर्यावरण अभ्यासकांनाही धक्का बसला. यावर अभ्यासकांनी आयआयटीएमच्या मदतीने याचा आढावा घेतला असता, येथील हवेची गुणवत्ता मोजत असलेल्या उपकरणांत त्रुटी असल्याने अयोग्य नोंद होत असल्याचे लक्षात आले. उपकरणातील ही त्रुटी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा एकदा येथील हवेची नोंद घेण्याचे काम सुरू झाल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
आयआयटीएमतर्फे (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटोरोलॉजी) मुंबई शहर आणि उपनगरात १० ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी उपकरणे बसविण्यात आली आहेत. कुलाबा, वरळी, माझगाव, बीकेसी, अंधेरी, मालाड, बोरीवली, भांडुप, चेंबूर आणि नवी मुंबई येथे ही उपकरणे आहेत. त्यांच्या माध्यमातून येथील हवेची गुणवत्ता पार्टीक्युलेट मॅटरमध्ये मोजली जाते.
माझगाव येथील हवाप्रदूषणाने गुरुवारी कहर केल्यानंतर येथील बांधकामांत वाढ झाल्याने आणि रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळे प्रदूषण वाढले असेल, असा तर्क सुरुवातीला लावण्यात आला. मात्र, नेहमी वरळी आणि कुलाबाएवढीच नोंदविण्यात येणारी माझगाव येथील हवा अचानक एवढी कशी प्रदूषित झाली, असा प्रश्न अभ्यासकांना पडला. येथील हवेच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यानंतर वातावरण फाउंडेशनचे भगवान केशभट यांनी यावर आयआयटीएमशी संपर्क साधला. यावर ही नोंद तपासण्यात आली असता, उपकरणांतील त्रुटीमुळे ही नोंद जास्त दाखविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्रुटी दूर करण्यात आल्या़